काबुल – अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायाधीश महिलांची आज अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या दोघींबरोबर अन्य काही जणही या गोळीबारात जखमी झाले आहेत. तालिबानबरोबरची शांतता चर्चा सुरू असतानाही देशातील हिंसाचार सुरूच आहे.
अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश असलेल्या दोन महिला आज सरकारी वाहनातून कचेरीच्या दिशेने जात असताना हा गोळीबार करण्यात आला. अहमद फहीम कविम या प्रवक्त्याने सांगितले. या गोळीबारात वाहनाचा चालकदेखील जखमी झाला, असे स्थानिक वृत्तपत्राने म्हटले आहे.
अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 200 महिला न्यायाधीश आहेत. त्यापैकी दोघी न्यायालयिन कामकाजाच्या वाहनातून जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी हे वाहन थांबवले आणि बेछुट गोळीबार केला, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तालिबाना प्रवक्ता सबिहुल्लाह मुजाहिद याने या हल्ल्यामागे तालिबान असल्याचा आरोप फेटाळला आहे.
अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून सरकारविरोधी हिंसाचार वाढला आहे. काही निवडक ठिकाणी बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या घटनाही वारंवार होत आहेत. अफगाणिस्तानमध्ये असलेल्या सैन्यात कपात करण्याचा निर्णय अमेरिकेने दोनच दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. आता अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे केवळ 2,500 सैनिक असणार आहेत.
गेल्या दोन दशकातील अमेरिकेच्या सैन्यदलाची ही सर्वत कमी संख्या अफगाणिस्तानमध्ये असणार आहे. सन 2020 मध्ये अतिरेकी गटांकडून 18,000 पेक्षा जास्त हल्ले केले गेले असल्याचे अफगाणिस्तानातील गुप्तहेर संस्थेचे प्रमुख अहमद झिया सिराज यांनी या महिन्याच्या सुरुवातीला खासदारांना सांगितले.