मुंबई – राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या आरोपांनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी आक्षेप नोंदवित विश्वास नांगरे पाटील यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
निलेश राणे म्हणाले कि, काय चाललंय महाराष्ट्रात??? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी?? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशांनी पोलिसांवर विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं, अस प्रश्न त्यांनी विचारला आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांची भेट घेत चर्चा केली. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात आहेत.
विश्वास नांगरे-पाटील हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचीत आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीचं कोणतंही कठीण प्रकरण सोडवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे विश्वास नांगरे या प्रकरणाची गुंतागुंत कशी सोडवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.