वॉशिंग्टन – कॅपिटॉल हिलवरील हिंसक निदर्शनांना चिथावणी दिल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग करण्याच्या ठरावाला अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने मान्यता दिली आहे. 232 विरुद्ध 197 मतांनी अध्यक्ष ट्रम्प यांना हटवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. महाभियोगाचा ठराव दोन वेळेला प्रतिनिधीगृहामध्ये मंजूर झालेले ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले अध्यक्ष ठरले आहेत.
बुधवारी प्रतिनिधीगृहात चर्चेनंतर झालेल्या मतदानाच्यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांबरोबर रिपब्लिकन पक्षाच्या 10 सदस्यांनी देखील ठरावाच्या बाजूने मतदान केले. 6 जानेवारीला कॅपिटॉल हिलवर झालेल्या बंडखोरीला चिथावणी दिल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आला. या हिंसक आंदोलनासाठी ट्रम्प यांनी आंदोलकांना भडकवण्याचे भाषण केले होते.
ट्रम्प समर्थकांच्या आंदोलनामुळे इलेक्टोरल कॉलेजच्या मतांची मोजणी तात्पुरती थांबवण्यात आली होती. या हिंसक आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. महाभियोगाच्या मतदानादरम्यान संसदेतील चार खासदार अनुपस्थित राहिले. ऍमी बेरा, रिओ खन्ना, राजा कृष्णमूर्ती आणि प्रमिला जयपाल या चारही भारतीय वंशाच्या खासदारांनी महाभियोगाच्या बाजूने मतदान केले.
ट्रम्प यांना पदावरून हटवण्यासाठी 25 वी घटनादुरुस्ती लागू करण्याची सूचना उपाध्यक्ष माईक पेन्स यांना एका ठरावाद्वारे करण्यात आली होती. मात्र 25 वी घटनादुरुस्ती केवळ अध्यक्षांच्या वैद्यकीय अस्वास्थ्यतेसाठी असल्याने ती लागू करण्यास पेन्स यांनी नकार दिला होता. 25 वी घटनादुरुस्ती 50 वर्षांपूर्वी तत्कालिन अध्यक्ष जॉन केनेडी यांच्या हत्येनंतर करण्यात आली होती.
अध्यक्ष आजारी अथवा अचानक मृत्यू पावल्याने निर्माण होणाऱ्या आपत्कलिन परिस्थितीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार उपाध्यक्षांना या घटनादुरुस्तीच्या अंमलबजावणीने मिळतात. उपाध्यक्ष आणि मंत्रिमंडळ मिळून अध्यक्षांना हटवण्याचा ठराव करू शकतात.
प्रतिनिधीगृहात महाभियोगाचा ठराव मंजूर झाल्यावर आता याबाबत सिनेटमध्ये ठराव होणार आहे. या ठरावादरम्यान सुनावणी, साक्ष, उलटतपासणी आणि मतदानही केले जाते. 20 जानेवारीला नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा शपथविधी असल्याने सिनेटचे कामकाज 19 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. सिनेटचे नियमित अधिवेशन सुरू नसल्याने हा ठराव होणे अवघड आहे. या ठरावासाठी सिनेटला एकमताने कामकाजाची तयारी दर्शवावी लागेल.
ट्रम्प यांनी बंडखोरांना चिथावणी दिली हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यांना जावेच लागेल, असे महाभियोगाच्या ठरावातील भाषणात नॅन्सी पेलोसी म्हणाल्या.
ट्रम्प हे देशासाठी धोकादायक आहेत. नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणूकीत अध्यक्ष परभूत झाले आहेत. ते वारंवार खोटे बोलले. त्यांनी लोकशाहीबद्दल स्वतःच शंका उपस्थित केल्या. अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे सत्य लपवण्यास भाग पाडले. त्यानंतर जे काही घडले, त्याचे आपण सर्वच जण साक्षीदार आहोत, अशा शब्दात पेलोसी यांनी ट्रम्प यांना लक्ष्य केले.
ट्रम्प यांच्याकडून शांततेचे आवाहन
ट्रम्प समर्थकांकडून वॉशिंग्टनमध्ये आणि देशभरात सर्वच राज्यांमध्ये विधीमंडळांवर पुन्हा धुडगूस घातला जाण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली होती. त्यामुळे महाभियोगावरील चर्चा सुरू असताना ट्रम्प यांनी शांततेचे आणि संयम बाळगण्याचे आवाहन देखील केले. कोणत्याही प्रकारे हिंसाचार व्हायला नको. कायदा मोडला जायला नको आणि कोणत्याही प्रकारे तोडफोड व्हायला नको, असे व्हाईट हाऊसमधून प्रसिद्धीस् दिलेल्या निवेदनात ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दोन वेळेस महाभियोग झालेले पहिलेच अध्यक्ष
अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत दोनवेळेस महाभियोगाच्या ठरावाला सामोरे जाणारे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिलेच अध्यक्ष ठरले आहेत. यापूर्वी 18 डिसेंबर 2019 रोजी प्रतिनिधीगृहाने ट्रम्प यांच्याविरोधातील महभियोगाचा ठराव सर्वप्रथम मंजूर केला होता.
ज्यो बायडेन यांच्यावर दबाव आणण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनला 400 दशलक्ष डॉलरच्या मदतीचा फायदा देऊ केला असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. डेमोक्रॅटिक पक्षाचे प्राबल्य असलेल्या प्रतिनिधीगृहात ठराव मंजूर झाला होता.
मात्र रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या सिनेटमध्ये फेब्रुवारी 2020 मध्ये हा ठराव मंजूर होऊ शकला नव्हता. सत्तेचा गैरवापर आणि कॉंग्रेसमध्ये आडकाठी आणण्याच्या आरोपातून ट्रम्प यांना मुक्त केले गेले होते.