नवी दिल्ली –आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याने सात वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेल्या वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतने मुश्ताक अली स्पर्धेत पहिल्याच सामन्यात एक बळी घेतला. तब्बल सात वर्षांनी त्याने प्रत्यक्ष सामन्यात गोलंदाजी करत यश मिळवले.
या स्पर्धेत केरळकडून श्रीशांतने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
त्याने पदुच्चेरी विरुद्धच्या सामन्यात फाबिद अहमदचा त्रिफळा उडवला. या सामन्यात केरळने पुदुच्चेरीवर 6 गडी राखून मात केली. पुद्दुचेरीने 20 षटकात 138 धावा केल्या होत्या. केरळने हे आव्हान 4 गडी गमावून पूर्ण केले व सामना जिंकला.
बीसीसीआयने आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीशांतवर ऑगस्ट 2013 साली बंदी घातली होती. त्याच्यासह राजस्थान रॉयल्सच्या अजित चंदीला आणि अंकित चव्हाण यांच्यावर देखील बंदी घातली गेली होती.
गेल्या वर्षी श्रीशांतवरील बंदीचा कालावधी कमी करून तो 7 वर्षे इतका केला होता. बंदी संपल्यावर त्याने पुन्हा केरळ संघासह नेट सराव सुरू केला होता. या स्पर्धेसाठी त्याचा संभाव्य संघात समावेश करण्यात आला होता, तेव्हाच त्याच्या पुनरागमनाकडे लक्ष लागले होते.