कुक्कुट म्हणजे कोंबडा. कुक्कुट हा शब्द संस्कृत आहे. या आसनामध्ये शरीराची अवस्था ही कोंबड्यासारखी होते म्हणूनच याला कुक्कुटासन म्हणतात. दोन्ही हाताच्या आधाराने संपूर्ण शरीर उचलले जाते.
कसे करावे हे आसन?
प्रथम पद्मासनात बसावे.
हाताची ध्यान मुद्रा ठेवावी.
मग ध्यान मुद्रा सोडून हात कंबरेजवळ टेकवावे.
डावा हात डाव्या पायाच्या मांडीतून जमिनीकडे न्यावा.
उजवा हात उजव्या पायाच्या मांडी आणि पोटरीतून कोपरापर्यंत बाहेर काढून जमिनीकडे न्यावा.
दोन्ही हाताची बोटे पसरवून जमिनीला टेकवावीत.
आता दोन्ही हाताच्या आधाराने शरीर उचलावे.
फक्त दोन्ही हाताचे पंजे जमिनीवर टेकलेले राहू द्यावेत.
या स्थितीत श्वसन संथ ठेवावे.
ही आहेत आसनाची वैशिष्टये
हटप्रदिपिका या ग्रंथात 23 व्या श्लोकात या आसनाचे वर्णन आहे. तर घेरंडसंहितेच्या दुसऱ्या उपदेशातील 31 व्या श्लोकात कुक्कुटासनाचे वर्णन केले आहे. पद्मासनात बसून गुडघे व मांडीतून हात घालून त्याच्या आधाराने पद्मासन उचलणे. आसन सोडताना सावकाश पद्मासन जमिनीवर टेकवावे. उजवा हात उजव्या पोटरी व मांडीतून वर काढावा. तर डावा हात डाव्या पोटरी आणि मांडीतून वर काढावा. परत हाताची ध्यान मुद्रा करा. हे आसन तोलात्मक आहे. यामध्ये तोल सांभाळणे महत्वाचे असते. त्याचा कालावधी 15 सेकंदापर्यंत ठेवता येतो. पण नियमित सरावाने एक मिनिटापर्यंत टिकवता येते.
काळ काळजी घ्याल?
या आसनात अधिक कालावधी वाढवणे शक्य नसते कारण संपूर्ण शरीराचे वजन म्हणजे खांदे, दंड, कोपरे, मनगटे यावर येते. हात जमिनीवर टेकल्यावर घाई न करता शरीर वर उचलावे म्हणजे तोल जाणार नाही. शरीर वर उचलताना भरपूर श्वास घ्यावा म्हणजे शरीर जमिनीपासून अधांतरी ठेवता येते. आसनस्थिती घेतल्यावर नेहमीचे श्वसन करावे. हे आसन जाड अथवा स्थूल व्यक्तींना सुलभतेने करता येत नाही. या उलट शरीरयष्टीने बारीक असलेल्या व्यक्ती हे आसन सहजतेने करू शकतात.
काय आहेत फायदे या आसनाचे?
या आसनामुळे स्नायूंची कार्यक्षमता वाढते. कंबरेतील आणि पोटातील रक्ताभिसण सुधारते. पोटात जंत झालेल्यांनी हे आसन जरूर करावे. तसेच हाताला संपूर्ण व्यायाम मिळत असल्यामुळे खांदे, कोपर, मनगट दणकट बनतात. मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांना येणारे नैराश्य कमी होते. मासिक धर्मात जर ओटी पोटात जर खूप दुखत असेल तर या आसनाच्या नियमित सरावामुळे हे दु:खने थांबते. शारिरीक उत्साह तर वाढतोच पण मनही प्रसन्न रहाते.
कुक्कुटासनात उत्थित पद्मासनाचे सर्व फायदे मिळतात. हातांचे सांधे बळकट बनतात. आतडी सशक्त होतात. एखाद्या व्यक्तीला अति झोप येत असेल तर कुक्कुटासनामुळे कमी होते. शरीरातील 72 हजार नाड्यांची शुद्धी होते. अजीर्ण, मुरडा होणे यासारखे विकार दूर होतात. शौचाला साफ होण्यास मदत होते. जठराग्नि प्रदिप्त होतो म्हणून कुक्कुटासन नियमित करावे. कुक्कुटासनामुळे शरीराबरोबर मनही प्रसन्न रहाते म्हणूनच स्त्री-पुरूष प्रत्येकाने कुक्कुटासनाचा सराव नियमित केला पाहिजे. पहिल्यांदा जमणार नाही पण प्रयत्न केल्यास कुक्कुटासन सहज जमेन.