वॉशिंग्टन – ट्रम्प समर्थकंनी कॅपिटॉल परिसरात केलेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. कॅपिटॉल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात या महिलेचा मृत्यू झाला, असे वॉशिंग्टनचे पोलीस प्रमुख रॉबर्ट कॉन्टी यांनी सांगितले. त्याव्यतिरिक्त अन्य तिघेजण वैद्यकीय आपत्कालिन परिस्थितीमध्ये मरण पावले, असेही त्यांनी सांगितले.
ट्रम्प समर्थकांचा जमाव आणि पोलिसांमध्ये सुमारे तासभर जोरदार धुमश्चक्री झाली. यावेळी दोन्ही बाजूंकडून रासायनिक फवाऱ्यांचा वापर केला गेला. कॅपिटॉलच्या प्रवेशद्वारापाशी असलेले अडथळे तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न जमावाकडून केला जात असताना झालेल्या गोळीबाराच्यावेळी एक महिला मरण पावली.
या महिलेला रुग्णालयात दाखल केले गेले, तिथे तिचा मृत्यू झाला. जमावाकडून फेकले गेलेले दोन पाईप बॉम्ब डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या बाहेर सापडले. तर एक पाईप बॉम्ब रिपब्लिकन नॅशनल कमिटीच्या बाहेर सापडला.
याशिवाय जवळच्या एका वाहनातून एक प्रेशर कुकर देखील सापडला आहे. याशिवाय एक लांब बंदुक आणि मोलोटोव कॉकडेल देखील कॅपिटोलच्या आवारात सापडले आहे. त्यावरून आंदोलक हिंसाचार करण्याच्या पूर्ण तयारीनिशी आले होते, हे स्पष्ट होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.