नामांतराच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं असतानाच अजित पवारांचं महत्वपूर्ण वक्तव्य; म्हणाले…

मुंबई – महाविकास आघाडी हे तीन पक्षांचं सरकार आहे. आम्ही किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. यामुळे नामांतराच्या विषयी एकत्र बसून चर्चा करु आणि योग्य मार्ग काढू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत ट्‌विटर अकाऊंटवरील ट्‌वीटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानंतर कॉंग्रसने जोरदार आक्षेप नोंदवला. नावं बदलून विकास होतो का, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली. 

अजित पवार म्हणाले, औरंगाबादच्या नामांतर विषयावर मी मागील आठवड्यातच बोललो होतो. राज्यात तीन पक्ष एकत्र येवून सरकार स्थापन करण्यात आले आहे. यासाठी किमान समान कार्यक्रम आम्ही तिघांनी ठरवला आहे.

तिघांचे सरकार चालत असताना काही विषय कधी निघू शकतात. याबाबत एकत्र बसून चर्चा करुन योग्य पद्धतीचा मार्ग काढू. या प्रकरणात नक्की काय झाले आणि जाणीवपूर्वक वाद उपस्थित केला जात आहे का या बाबी तपासल्या जातील. आम्ही एकत्र मार्ग काढू. कधीकधी अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात. यामागचं नक्की कारण काय आहे हे शोधण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.