पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाची सेवा सध्या हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, यातच आता सीएनजीच्या वाढलेल्या दराचा आर्थिक भुर्दंड पीएमपीला सहन करावा लागणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 1 हजार 759 बसेस सीएनजीवर धावणाऱ्या आहेत. मात्र, सध्या पीएमपीच्या स्वत:च्या मालकीच्या आणि भाडेतत्वावरील सुमारे एक हजार सीएनजी बसेस धावतात. रविवारी मध्यरात्रीपासून सीएनजीची किंमत वाढली आहे.
पीएमपीला सीएनजी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून सीएनजीच्या दरात देखील वाढ केली आहे. प्रती किलो 1 रुपया 55 पैसे दर वाढविण्यात आल्याने, आजवर सुमारे 53 रुपये 95 पैसे प्रती किलोने उपलब्ध होणारा सीएनजी आता 55 रुपये 50 पैसे दराने खरेदी करावा लागणार आहे.
पीएमपी प्रशासनाला दैनंदिन सुमारे 60 हजार किलो गॅसची गरज भासते. यासाठी दररोज सुमारे 32 लाखांच्या घरात खर्च येतो. मात्र, आता दरवाढ झाल्याने दररोज सुमारे 33 लाख 30 हजार रुपयांचा खर्च पीएमपीला येणार असून, दररोज सरासरी 90 हजार रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.