पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात “फेम’ योजनेंतर्गत भाडे तत्वावर धावणाऱ्या 350 ई-बसेसच्या निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर “ओलेक्ट्रा’ या कंपनीकडून या गाड्या घेण्यात येणार असून, या गाड्यांमुळे चांगली सेवा मिळणार असून, खर्चदेखील कमी होणार आहे.
केंद्र शासनाच्या “फेम’ योजनेंतर्गत महामंडळाने 600 ई-बसेस उपलब्ध होण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव दिला होता. यासाठी प्रतिबस 55 लाख रुपये सबसिडी केंद्राकडून मिळणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून आणि संचालक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर “ईव्हीईवाय ट्रान्स प्रा. लि'(ओलेक्ट्रा) या कंपनीला 63.15 रुपये प्रति किमी (इलेक्ट्रिक शिवाय) नुसार रक्कम देण्यात आहे. 12 मीटर 350 एसी बीआरटी ई-बसची निविदा प्रक्रिया जुलै 2019 मध्ये राबविली होती. यात टाटा मोटर्स आणि ईव्हीईबाय ट्रान्स या दोन कंपन्या सहभागी झाल्या होत्या. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रियेला संचालक मंडळाच्या मान्यतेनुसार तात्पुरती स्थगिती दिली होती.
“सीआयआरटी’च्या नियमांप्रमाणे महामंडळास प्रति 1 लाख लोकसंख्येस 50 बसेसची आवश्यकता आहे. या अनुषंगाने शहराची लोकसंख्या विचारात घेता 3,500 बसेसची आवश्यकता आहे. महामंडळाकडे सध्या 2,431 बसेस आहेत. यापूर्वी घेतलेल्या ट्रायलमध्ये “ईव्हीईवाय ट्रान्स’ कंपनीच्या 12 मीटर बसचे संचलन समाधानकारक असल्याने 350 ई-बस निविदेचे दर संचालक मंडळाच्या मान्यतेनुसार उघडण्यात आले.
फेम-2 साठी 63.95 प्रति किमी रुपयांप्रमाणे कंपनीला रक्कम देण्यात येणार असून, या गाड्या प्रतिदिन 225 किमी धावणे अपेक्षित आहे. कंपनीबरोबर 12 वर्षांचा करार करण्यात येणार आहे. यासाठी संचालक मंडळाने जानेवारीअखेर मान्यता दिली असून, याबाबत 28 जानेवारी रोजी कार्यादेशदेखील देण्यात आला. तर, 350 बसेस ऑगस्ट 2021 अखेर प्राप्त होणार आहेत, असे पीएमपीच्या वतीने सांगण्यात आले.