पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अटल सेवेला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन महिन्यांत सुमारे 24 लाखांहून अधिक नागरिकांनी प्रवास केला असून, सुमारे 1 कोटी 21 लाखांहून अधिक रुपयांचे उत्पन्न पीएमपीला मिळाले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वतीने 25 ऑक्टोबरपासून अटल बससेवा सुरू करण्यात आली. यामध्ये प्रवाशांना 5 किलोमीटरपर्यंतचा प्रवास 5 रुपयांमध्ये करण्यात येतो. या योजनेंतर्गत 23 डिसेंबरपर्यंत 24 लाख 33 हजार 513 नागरिकांनी केला असून, 1 कोटी 21 लाख 67 हजार 565 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
अटल बससेवेंतर्गत शहराच्या मध्यवर्ती भागात 9 मार्गांवर 99 बसेस संचलनासाठी बसेस पहिल्या टप्प्यात सोडल्या होत्या. प्रशासनाकडून 1 महिन्याचा आढावा घेण्यात आला. काही मार्गांचा सर्व्हे करून 99 बसेसपैकी 38 बसेस कमी करून, प्रवासी संख्या आणि उत्पन्न जास्त असणाऱ्या मार्गांवर 18 जास्त बसेस सोडल्या आहेत.
स्वारगेट ते शिवाजीनगर, स्वारगेट ते पुणे स्टेशन मार्गावर अधिक प्रतिसाद असून, या मार्गांवर अनुक्रमे 12 आणि 6 बसेस वाढविल्या आहेत. तर, डेपो ट्रान्झिट संकल्पनेंतर्गत 53 मार्गांवर 143 बसेसचे नियोजन केले होते. याचादेखील आढावा घेऊन, 24 मार्गांवरील 52 बसेस कमी करून 8 मार्गांवर नवीन बसेस उपलब्ध केल्या आहेत. हडपसर ते फुरसुंगी, कात्रज ते जांभूळवाडी, कात्रज ते नऱ्हेगाव, हडपसर ते महंमदवाडी, भोसरी ते दिघी या मार्गांवर ट्रान्झिट बससेवेला सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.