शिक्रापूर (वार्ताहर) – एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा व पेरणे फाटा येथे होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक वेगळ्या मार्गाने वळविण्यात येणार असल्यामुळे पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
मानवंदना कार्यक्रम करोनाच्या प्रादुर्भावामुळे छोट्या स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे; मात्र तरीदेखील प्रशासनाने नेहमीप्रमाणे योग्य ती खबरदारी घेतलेली असून दरवर्षीप्रमाणे वाहतुकीत बदल केला आहे.
तर एक जानेवारी रोजी अहमदनगर बाजूने पुणेच्या दिशेने येणारी सर्व वाहने शिक्रापूर चौकातून चाकण मार्गे, पुणे बाजूने अहमदनगरकडे जाणारी वाहने येरवडा, आळंदीमार्गे चाकण, शिक्रापूर दिशेने तसेच खराडी मार्गे हडपसर, केडगाव चौफुला मार्गे शिरूर दिशेने, नगर बाजूने हडपसरच्या दिशेने येणारी सर्व जड वाहने न्हावरा फाटा तसेच केडगावमार्गे वळविण्यात आलेली आहेत.
आळंदी बाजूने अहमदनगरकडे जाणारी वाहतूक मरकळ, शेलपिंपळगाव मार्गे शिक्रापूर बाजूने वळविण्यात येत आहे, तर एक जानेवारी रोजी नागरिकांनी देखील वाहनांचा वापर न करणे सोयीस्कर राहणार असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.