वाघोली – पुणे-नगर रोडसह इतर रस्त्यांवर सकाळी सात ते दहा व सायंकाळी पाच ते नऊ यावेळेत सर्व प्रकारच्या जड, अवजड, मंदगती (डंपर, आर.एम.सी. मिक्सर, जे.सी.बी., रोड रोलर व इतर तत्सम वाहने) वाहनांची वाहतूक तसेच पार्किंग करण्यास बंदी करण्यात आली आहे. पुणे वाहतूक विभागाचे उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी तात्पुरत्या स्वरुपात प्रायोगीक तत्वावर हा आदेश काढला आहे. यावर पाच मार्च पर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. ( Heavy traffic prohibited)
पुणे शहरात वाहनांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली आहे. विविध मोठे प्रकल्प (मेट्रो, उड्डाणपूल, विविध विकासकामे) सुरु आहेत. तसेच अवजड वाहनांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे नागरिकांना धोका निर्माण होवून गैरसोय होते. हे सर्व टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशातून अत्यावश्यक वाहने व पीएमपीएमएल, खाजगी बसेस वगळण्यात आली आहेत. याबाबत पाच मार्चपर्यंत नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर अतींम आदेश काढण्यात येणार आहे.
रस्त्याचे नाव- जड वाहतूक बंदी रस्ते/ठिकाण वेळ (सकाळी ७ ते १०, संध्याकाळी ५ ते ९)
पुणे नगर रोड – वाघेश्वर चौक, वाघोली ते खराडी बायपास
केसनंद रोड- वाघोली ते छत्रपती शिवाजी चौक केसनंद गांव
लोहगाव वाघोली रोड – लोहगाव चौक, वाघोली ते लोहगाव ते धानोरी मार्गे विश्रांतवाडी
पुणे नगर रोड- वाघेश्वर चौक, वाघोली ते लोणीकंद
लोहगाव रोड- लोहगाव ते पेट्रोलसाठा चौक ते विश्रांतवाडी
(सकाळी आठ ते रात्री अकरा पर्यंत)