नेवासे फाटा (पवन गरुड/प्रतिनिधी) – भूलोकीचा स्वर्ग म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र देवगड येथे दत्तजयंती निमित्ताने मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्तात्रय भगवान की जय, असा दत्त नामाचा जयघोष करत पुष्पवृष्टी करत सायंकाळी 6 वाजता गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. करोनाची महामारी लवकरात लवकर जाऊ द्या, सारे विश्व सुखी होऊ द्या, असे साकडे दत्त जन्मप्रसंगी महंत भास्करगिरी महाराज यांनी भगवान दत्तात्रयांना घातले.
यावर्षी करोना महामारीचे संकट असल्याने श्रीक्षेत्र देवगड मंदिर प्रांगणात श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत यंदाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी 6 वाजता श्री दत्त मंदिरात छोटेखानी पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी पहाटे महंत गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात येवून अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर भास्करगिरी बाबांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात येवून आरती करण्यात आली.
यावेळी झालेल्या दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी महंत सुनीलगिरी महाराज, महंत योगी ऋषीनाथ महाराज, गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मातोश्री सरूबाई पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव लंघे, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, धनश्री विखे, बदनापूरचे आमदार नारायण कुचे, आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी, सरपंच अजय साबळे, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, मारुतीराव साबळे, दिनकरराव कदम यांच्यासह संत-महंत उपस्थित होते.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र देवगड येथे दत्तजयंती निमित्त सकाळी 8 वाजता दिगंबरा… दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ… दिगंबराचा जयघोष करत मंदिर प्रांगणात गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात आली.
सजवलेल्या पालखी रथात श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मंदिर प्रांगणात प्रदक्षिणास प्रारंभ करण्यात आला. अग्रभागी भक्तिगीते गाणारे बॅंड पथक, सनई चौघडा वादक, त्यामागे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत दिगंबरा… दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा… असा जयघोष करत मोजकेच झेंडेकरी मिरवणुकीत सहभागी झाले होते.
यात्रा रद्दचा निर्णय याआधीच झाल्याने आज पहाटेपासून देवगडकडे येणारे रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे प्रवरासंगम, देवगडफाटा, नेवासे येथून देवगडकडे जाणारे रस्ते ओस पडलेले दिसत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे, नेवासे पोलीस स्टेशनचे आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत दाते, विनय ठाकूर, पीएसआय प्रदीप शेवाळे, होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.
दुपारी 12 वाजता दत्तजयंती निमित्ताने सात दिवस चाललेल्या दत्त यागाची गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते पूजन करून होम कुंडात श्रीफळ अर्पण करण्यात येवून पूर्णाहुती देण्यात येवून सांगता करण्यात आली. झालेल्या दत्त योगाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न आचार्य शरदगुरू काटकर, गणेशदेवा कुलकर्णी यांचेसह ब्रह्मवृंद मंडळींनी केले. दत्तजन्म झाल्यानंतर उपस्थित मोजक्याच भाविकांना आमटी भाकरीचा प्रसाद वाटण्यात आला.