मुंबई – मुंबई पोलिसांनी डिझायनर कार खरेदी, विक्री आणि फायनान्स करुन लोकांची कोट्यावधींची फसवणूक केल्याचा गुन्हा उघडकीस आणला आहे. हे रॅकेट देशातील अनेक राज्यात पसरल्याचा अंदाज आहे. या फसवणूकच्या गुन्ह्यात प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया याला अटक करण्यात आली आहे. दिलीप छाबरिया हा डिझाईन्स प्राव्हेट लिमीटेड या कंपनीचा मालक आहे.
नरीमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलजवळ डी सी अवंती गाडी येणार आहे. ज्या गाडीचा नंबर हा बोगस आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे 17 डिसेंबर रोजी सापळा रचला. मात्र त्या दिवशी गाडी आली नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 डिसेंबरला ताज हॉटेल कुलाबा या ठिकाणी पुन्हा सापळा रचण्यात गाडी ताब्यात घेण्यात आली. यानंतर चौकशी केली असता धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली.
गाडी चालवत असलेल्या मालकाची जेव्हा विचारपूस पोलीसांकडून केल्यानंतर गाडी मालकाने गाडीचे पेपर पोलिसांना दिले जे खरे होते. चेन्नईच्या पत्त्यावर रजिस्टर होते. मात्र पुढील तपासात असे निदर्शनास आले की, त्याच चेसिस आणि इंजीन नंबरवर दुसरी गाडी हरियाणामध्ये रजिस्टर करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासामध्ये पोलिसांच्या हाती अतिशय महत्त्वाची माहिती लागली. 120 डीसी अवंती गाड्या या भारतात आणि भारताच्या बाहेर विकल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये एका गाडीची किंमत अंदाजे 42 लाख रुपये आहे. एका गाडीवर एका फायनान्स कंपनीपेक्षा अधिक फायनान्स कंपन्यांकडून लोन घेण्यात आले आहे. तसेच दिलीप छाबरिया डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्वतः बनवलेल्या गाड्या स्वतः विकत घेतल्या आहेत. 90 गाड्यांवर एक पेक्षा जास्त फायनान्स कंपनी कडून लोन घेण्यात आले आहे.
यामुळे सरकारच्या महसुलाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शंका आहे. कस्टम ड्युटी, जीएसटी अशाप्रकारचे काही कार या कंपनीकडून चढवण्यात आले आहेत का आणि त्यांचं प्रमाण किती आहे याचाही तपास क्राइम ब्रांच कडून केले जात आहे.