पुणे – सहकारी बॅंकिंग विश्वात आपला वेगळा ठसा उमटवलेल्या जनता सहकारी बॅंक, पुणेने सातारा रोड येथे स्वमालकीची नवीन वास्तू उभारली आहे. या नवीन वास्तूमध्ये सोमवार दिनांक 28 डिसेंबर रोजी बॅंकेच्या मुख्य कार्यालयाशी संलग्न काही विभाग स्थलांतरित करण्यात आले.
बॅंकेचे अध्यक्ष माधव माटे यांच्या हस्ते नवीन वास्तूमध्ये दीपप्रज्वलन करून येथील दैनंदिन कामकाजाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी बॅंकेच्या उपाध्यक्षा अलका पेटकर, संचालक मंडळ सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जयंत काकतकर आणि वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
जनता बॅंकेची स्वमालकीची नवीन वास्तू सुमारे 20 हजार चौरस फूट इतकी आहे. त्यापैकी साडेसात हजार चौरस फूट जागेत बॅंकेच्या आठ विभागाचे दैनंदिन कामकाज सुरू करण्यात आले. या वास्तूचे जुने जागा मालक सागर कुलकर्णी व आगलावे आणि नवीन सिव्हील फर्निचर कॉन्ट्रक्टर राजेश गोवंडे यांचा सत्कार करण्यात आला.
जनता सहकारी बॅंक पुणेच्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात 71 शाखा कार्यरत असून बॅंकेची आज अखेरची एकूण उलाढाल रुपये 13,902 कोटींपेक्षा अधिक आहे.