नगर – लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता अद्यापही आर्थिक संकटातून सावरलेली नाही. त्यातच केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर दरात वाढ केल्यामुळे गृहिणींचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने आक्रमक भूमिका घेत रस्त्यावरच चुली पेटवून दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला.
गॅस सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीने सिद्धिबागेसमोरील रस्त्यावर चुली मांडून भाकरी भाजण्याचे आंदोलन करत निषेध केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, सुनंदा कांबळे, सुनीता पाचरणे, मनीषा सरोदे, सारिका खताडे, शीतल राऊत, शीतल गाडे, उषा सोनटक्के, वर्षा कुऱ्हाडे, गीता कामत, लीला डाडर, ज्योती निकम, अर्चना केदारी आदींसह महिला उपस्थित होत्या.
यावेळी आठरे म्हणाल्या, गॅस सिलिंडर दरवाढ गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक असून, त्याच्याबरोबर पेट्रोल आणि डीझेलच्या दरातही सातत्याने दरवाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटंबांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. या दरवाढीचा त्रास गृहिणींनाच जास्त होत आहे.
करोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असताना केंद्र सरकार मात्र दिलासा देण्याऐवजी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ करून त्यांची गळचेपी करत आहे. सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम केंद्र सरकार जाणीवपूर्वक करत आहे.
सरकारने रेशन दुकानांत मिळणारे रॉकेलही बंद केल्याने गरीब व मध्यमवर्गीय जनतेला गॅस सिलिंडरशिवाय पर्याय उरलेला नाही. खुल्या बाजारातील रॉकेल 70 रुपये प्रतिलिटरने खरेदी करावे लागते. त्यामुळे सामान्य नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. अनुदानित सिलिंडरची संख्यादेखील कमी आहे. दर महिन्याला सरकार दरवाढ करू लागले आहे. त्यामुळे त्वरित ही दरवाढ रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली.