सुपा – पारनेर तालुक्यातील सुपा येथील पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास आलेल्या काही व्यक्तींनी महिला पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली. तसेच मारहाण करून व गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार आज पहाटेच्या सुमारास घडला.
याप्रकरणी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवार (दि. 27) रात्री महिला पोलीस कर्मचारी भीमाबाई रेपाळे या सुपा पोलीस ठाण्यात रात्रपाळीच्या ड्यूटीवर होत्या. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास बन्सी रामचंद्र कांबळे (रा. इंदिरानगर मराठी शाळेजवळ, सुपा. ता. पारनेर) हे त्यांची मुलगी शिवानी बन्सी कांबळे, तेजश्री बन्सी कांबळे तसेच मंदा संपत गांगुर्डे (रा. सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर, मुंबई) तसेच अशोक पिराजी जाधव (रा. सुपा, ता. पारनेर) यांच्यासह फिर्याद दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते.
यावेळी सर्व्हर डावून असल्याने ऑनलाइन फिर्याद नोंदविण्यास विलंब होत होता. त्यामुळे वरील व्यक्तींनी आमची फिर्याद घेण्यास का टाळाटाळ करत आहात, असे विचारत रेपाळे यांना शिवीगाळ सुरू केली. रेपाळे त्यांना समजावून सांगत असताना शिवानी बन्सी कांबळे हिने दोन्ही हाताने रेपाळे यांचा गळा दाबून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तेजश्री बन्सी कांबळे व मंदा संपत गांगुर्डे या दोघांनी मारहाण करून जखमी केले. बन्सी रामचंद्र कांबळे व अशोक पिराजी जाधव यांनी त्यांच्या कामात अडथळा आणला.
याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात रेपाळे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांवर जिवे मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कसे हे करत आहेत.
पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यास मारहाणीसह जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात घेणार आहोत.
नितीशकुमार गोकावे
पोलीस निरीक्षक, सुपा पोलीस ठाणे