महोबा – उत्तरप्रदेशातील इमिलिया गावात एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या चकमकीत तेरा जण जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला. त्यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ले केले.
तथापि यावेळी दोन्ही गटांतील लोक दारू प्यायलेले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. जखमींना सरकारी रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. एका गटातील व्यक्तीने अल्पवयीन मुलीची छेड काढण्याचा प्रकार तीन महिन्यांपुर्वी घडला होता. त्यावरून तेथे आधीपासूनच धुसफुस सुरू होती.
त्याचे पर्यावसन काल दोन गटांतील मारामाऱ्यांमध्ये झाले. त्यातून गावात मोठा तणाव निर्माण झाला आहे. रूग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार यात 20 जण जखमी झाले असून त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.