-->

खासगी बस-कारचा भीषण अपघात; चौघे ठार

पाथर्डी –  तालुक्‍यातील करंजी गावाजवळ कल्याण-विशाखापट्टण महामार्गावर खासगी बस व कार यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर एका जखमीस उपचारासाठी नेत असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. हा अपघात आज पहाटे दोनच्या सुमारास घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सेलू (जि. परभणी) येथील केशव-छाया ट्रॅव्हल्सची लक्‍झरी बस (क्र. एमएच- 38 एक्‍स- 8555) पुण्याहून नांदेडकडे जात होती. तसेच कार (क्र. एमएच- 12 सीडी- 2912) पाथर्डीहून नगरकडे जात होती.

ही दोन्ही वाहने कल्याण-विशाखापट्टण महामार्गावरून करंजीजवळ असलेल्या सुभद्रा हॉटेलसमोर आली असता, त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला. तसेच कारमधील केशव विलास बोराडे (वय 25, रा. कोथरूड, पुणे), परमेश्‍वर लक्ष्मणराव डाके (वय 40, रा. सदर), बाळासाहेब शंकरराव कदम (रा. धामणगाव, ता. सेलू, जि. परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच चालक विनोद धावणे यांना उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला.

अपघातानंतर खासगी लक्‍झरी बसचालक फरार झाला. भरधाव वेगातील दोन्ही वाहने एकमेकांवर जोरात धडकल्यामुळे मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील वस्त्यांवर राहणारे ग्रामस्थ आवाजाने जागे झाले. त्यानंतर त्यांनी अपघात स्थळाकडे धाव घेतली.

तसेच अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. वाय. गोल्हार, संजय आव्हाड, एस. एन. धीवर, जे. आय. पोटे, के. के. कराड, व्ही. एस. कांबळे, पाथर्डी पोलीस ठाण्याचे हवालदार अरविंद चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य सुरू केले.

यावेळी देवराई येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पालवे, गणेश अकोलकर, प्रमोद क्षेत्रे, रमेश क्षेत्रे यांच्यासह खासगी बसमधील काही प्रवाशांनी पोलिसांना मदत केली. तिसगाव येथील श्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. रणसिंग यांनी जखमीस रुग्णालयात हलवण्यासाठी तत्काळ घटनास्थळी रुग्णवाहिका पाठविली. पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती घेतली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.