पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी राज्यभरातून वैद्यकीय आणि आरोग्य सेवेशी संबंधित साडेसहा लाख कर्मचाऱ्यांनी “को-विन ऍप’वर नोंदणी केली. ऍपवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाच ही लस दिली जाणार असून, त्यासाठी शंभर लाभार्थ्यांमागे निवडणुकीच्या नियोजनाप्रमाणेच एक बुथ उभारण्यात येणार असल्याचे राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी लसीकरणाची जय्यत तयारी केली आहे. आता केवल लस हातात येण्याची प्रतिक्षा आहे. लस उत्पादक कंपन्यांनी विकसित केलेल्या करोना लसीच्या आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी (इमर्जन्सी यूज ऑथोरायजेशन) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे अर्ज केल्यावर, लसीकरणाच्या तयारीने वेग घेतला आहे. पहिल्या टप्प्यांत आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.
करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या सरकारी आणि खासगी दवाखान्यातील आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यामध्ये डॉक्टरांपासून वॉर्डबॉयपर्यंत सर्व घटकांचा समावेश आहे. त्यांची नोंदणी “को-विन ऍप’वर केली जात आहे.
याशिवाय लसीकरण कसे करावे, याबाबत देशपातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रमही घेण्यात येत आहेत. त्यामध्ये नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या डॉक्टर अणि लसीकरण अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले. आता हे प्रशिक्षणार्थी महापालिका आणि जिल्हा स्तरावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत असून, डिसेंबर अखेरपर्यंत हा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण होईल, असेही डॉ. पाटील यांनी नमूद केले.