नवी दिल्ली – तेल उत्खनन क्षेत्रातील ब्रिटिश कंपनी केर्न एनर्जीने जागतिक लवादात भारताविरुद्धचा कर मागणीचा खटला जिंकला आहे.
भारत सरकारने पूर्वलक्षी प्रभावाने कर कायद्याची अंमलबजावणी करून केर्न एनर्जीकडे 10,247 कोटी रुपयाच्या कराची मागणी केली होती. केर्न एनर्जीने 2006-07 मध्ये आपल्या जागतिक व्यापाराची फेररचना केल्यानंतर भारत सरकारने या कंपनीकडून 10,247 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर भारत सरकारने या कर्जाच्या वसुलीसाठी केर्न एनर्जी कंपनीचा काही निधी गोठविला होता.
ही रक्कम व्याजासहित भारत सरकारने कंपनीला द्यावी असे लवादाने म्हटले आहे. तीन महिन्यापूर्वी अशाच खटल्यात आंतरराष्ट्रीय लवादाने भारत सरकारला व्होडाफोन समूहाला पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलेली कराची रक्कम परत करण्यास सांगितले होते.