नवी दिल्ली – अमेरिकेने जाहीर केलेले पॅकेज आणि ब्रेक्झीट कराराच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात सोने ( Gold Price Today )आणि चांदीच्या ( Silver Price Today ) दरात घसरण होत आहे. याच कारणामुळे भारतीय सराफातही कालपासून सोन्याचे दर कमी होत आहेत.
बुधवारी दिल्ली सराफत सोन्याचे दर 252 रुपयांनी कमी होऊन 49,506 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तयार चांदीचा दर 933 रुपयांनी कमी होऊन 66,493 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
सोन्याच्या दराबाबत मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या संस्थेचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, जागतिक शेअर आणि कमोडिटी बाजारामध्ये सध्या अतिशय लवचिक परिस्थिती आहे. अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. याचा तुलनात्मक आढावा घेऊन गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासंदर्भातील निर्णय घेत आहेत. त्यामुळे आगामी काळात सोने आणि चांदीचे दर अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या खाली गेल्यास दिर्घ पल्ल्याचा विचार करून गुंतवणूक करणाऱ्यानी सोने काही प्रमाणात खरेदी करण्यास हरकत नसल्याचे बऱ्याच विश्लेषकांनी सूचविले आहे.