पिंपरी(प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (एक) संतोष चंद्रकांत पाटील यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पुणे विभागाच्या महसूली संवर्गात पदोन्नती दिली आहे. या बदलीबाबतचे आदेश महसूल विभागाचे उपसचिव डाॅ. माधव वीर यांनी दिले.
दोन वर्षांपूर्वी 29 सप्टेंबर 2018 रोजी नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती पिंपरी-चिंचवडच्या अतिरिक्त आयुक्तपदी झाली होती. संतोष पाटील यांची प्रथम विदर्भात यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर मराठवाड्यात ही त्यांनी विविध पदावर काम केले आहे. ते मुळचे सोलापुर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहेत.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने केलेल्या शिफारसीनूसार अप्पर जिल्हाधिकारी या संवर्गातील सात अधिका-यांना सक्षम प्राधिका-यांच्या मान्यतेने पदोन्नती देण्यात आली आहे. सरळसेवेने व पदोन्नतीने महसूली विभागात अप्पर जिल्हाधिकारी संवर्गात प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली.
त्यानूसार पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना पुणे विभागात महसूली संवर्गात अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.