पुणे – लसीकरणासाठी 17 हजार कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता केवळ लसीचे “वेट अँड वॉच’ राहिले आहे. राज्यपासून ते तालुका पातळीपर्यंतची लसीकरणाची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. डी. एन. पाटील यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग या सगळ्यांकडून लाभार्थ्यांच्या याद्या मागवल्या आहे. लसीकरणासाठी बनवलेल्या खास पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. दोन लाखांपेक्षा जास्त नोंदणी झाली आहे. ही लस देण्यासाठी जे वॉलेंटियर्स आहेत ज्यांना “वॅक्सिनेटर’ म्हणतो, त्यांचे राष्ट्रीय स्तरावरचे प्रशिक्षण 8 आणि 9 डिसेंबर रोजी पूर्ण झाले. सध्या 17 हजार वॅक्सिनेटर पुरेसे आहेत. परंतु अधिक लागल्यास वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत खासगी संस्थांना आवाहन करणार असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.
मागे दोन वर्षांपूर्वी रुबेला लसीकरणाचा अनुभव गाठीशी आहे. त्यावेळी सुमारे तीन कोटी नागरिकांना ही लस देण्यात आली. त्याच पद्धतीने सेंटर्सची स्थापना करून ही लसदेखील दिली जाणार आहे.
लस वितरणाच्या नियोजनासाठी विविध समित्या नेमल्या आहेत. नऊ विभागांमध्ये ती सोय केली आहे. आताच्या परिस्थितीत कोणत्या कंपनीची, कोणत्या प्रकारची लस पुरवठा करण्यात येणार हे माहित नाही, परंतु राज्याच्या प्रशासनाकडून सर्व प्रकारची सज्जता करण्यात आल्याचा दावाही डॉ. पाटील यांनी केला.