#NZvWI : न्यूझीलंडचा विंडीजवर डावाने विजय

वेलिंग्टन –टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाने घरच्या मैदानावर सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा डावाने पराभव केला. या विजयासह त्यांनी वेस्ट इंडिजला व्हाइटवॉश दिला. हा सामना यजमान न्यूझीलंडने 1 डाव आणि 12 धावांनी जिंकला. 

न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात हेन्री निकोल्सच्या शतकाच्या मदतीने 460 धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजचा पहिला डाव 131 धावांवर संपवत त्यांना फॉलोऑनही दिला. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. मात्र, जॉन कॅम्बेल, कर्णधार जेसन होल्डर व जोशआ डिसिल्व्हा यांनी अर्धशतकी खेळी केली पण त्यांना अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही व त्यांचा दुसरा डाव 317 धावांवर संपुष्टात आला व यजमान न्यूझीलंडने एक डाव आणि 12 धावांनी हा सामना जिंकला.

वेस्ट इंडिजचा पहिला डाव संपवताना न्यूझीलंडच्या काएल जेमिन्सन व टीम साऊदी यांनी प्रत्येकी 5 गडी बाद केले. फॉलोऑननंतरही वेस्ट इंडिजला सामना वाचवण्याची संधी होती. मात्र, त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली. एकवेळ वेस्ट इंडिजची अवस्था 5 बाद 134 अशी झाली. यानंतर कर्णधार जेसन होल्डर आणि जोशुआ डिसिल्व्हा यांनी अर्धशतकी खेळी करत काही काळ संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे प्रयत्नही फोल ठरले.

होल्डरने 61 तर, डिसिल्व्हाने 57 धावांची खेळी केली. विंडीजचा दुसरा डाव 317 धावांवर संपवत न्यूझीलंडने 1 डाव आणि 12 धावांनी सामन्यात बाजी मारली. दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्ट व नेल वॅगनर यांनी प्रत्येकी 3 तर साऊदी व जेमिन्सन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड पहिला डाव – 460 धावा. वेस्ट इंडिज पहिला डाव – 56.4 षटकांत सर्वबाद 131 धावा. (जेरेमी ब्लॅकवूड 69, काएल जेमिसन 5-34, टीम साऊदी 5-32). वेस्ट इंडिज दुसरा डाव – 79.1 षटकांत सर्वबाद 317 धावा. (जॉन कॅम्बेल 68, शेमरन ब्रुक्‍स 36, जेसन होल्डर 61, जोशुआ डिसिल्व्हा 57, नेल वॅगनर 3-54, ट्रेन्ट बोल्ट 3-96, काएल जेमिसन 2-43, टीम साऊदी 2-96).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.