मुंबई – मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याची पाणीपट्टी थकली असल्याची बातमी आज प्रसारीत झाली होती, पण या बंगल्यावर कोणतीही पाणीपट्टी थकबाकी नाही असा खुलासा मुंबई महापालिकेने दिला आहे.
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि त्याच्या शेजारी त्यांच्या सुरक्षा रक्षकांसाठी राखीव असलेला तोरणा बंगला या दोन्ही मिळकतींवर पाणीपट्टीची कोणतीही थकबाकी नसल्याचे महापालिकेने आज अधिकृतपणे स्पष्ट केले आहे.
माहिती अधिकाराचे कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबईतील मंत्र्यांच्या निवासस्थानाच्या संबंधात जे थकबाकीदार आहेत त्यांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावरून मिळवली होती.
त्यात वर्षा व तोरणा या बंगल्यासह विविध मंत्र्यांच्या बंगल्यांवर पाणीपट्टीची एकूण सुमारे 24 लाखांची थकबाकी असल्याची माहिती मिळाली आहे असा दावा त्यांनी केला होता. व त्या आधारे ही बातमी प्रसारीत झाली आहे. पण महापालिकेने त्याविषयी खुलासा केल्याने तो विषय निकालात निघाला आहे.