नवी दिल्ली – मूळचे उत्तराखंडचे असलेले साहित्य अकादमी पुरस्कार विजेते विख्यात हिंदी कवी, पत्रकार मंगलेश डबराल यांचे करोनाच्या प्रादुर्भावामुळे कोविड-19ची लागण झाल्याने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. करोनाची लागण झाल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले होते.
“जनसत्ता’ , “पूर्वग्रह’ “अमृत प्रभात’ आणि “सहारा समय’ अशा विविध माध्यमांमध्ये डबराल यांनी काम केले होते. त्यांच्या कविता, कथा आणि ललित लेखनाला एक वैचारिक बैठक होती. त्यांच्या “हम जो देखते है…’ या कवितासंग्रहाला वर्ष 2000 चा साहित्य अकादमी पुरस्कारही जाहीर झाला होता. “पहर पर लालटेन’, “घर का रास्ता’, ” आवाज भी एक जगह हैं’ आणि “नया युग’ अशा त्यांच्या कवितासंग्रहांना वाचकांची पसंती मिळाली होती.
मंगलेश डबराल यांच्या साहित्याचे विविध भारतीय तसेच, जर्मन, फ्रेन्च, रशियन, स्पॅनिश अशा विविध परदेशी भाषांतूनही अनुवाद झाले आहेत. नव्या युगाशी नाते जोडणारा चिंतनशील आणि सहृदय साहित्यिक अशी त्यांची ओळख होती आणि ती त्यांनी अखेरपर्यंत जपली.