पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 118 वा पदवीप्रदान समारंभ येत्या मार्च-एप्रिलमध्ये होणार आहे. यासाठी पदवी व पदविका प्रमाणपत्र प्राप्त करू इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑनलाइनद्वारे करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना, शुल्काची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पदवी व पदविका प्रमाणपत्रासाठी नियमित शुल्कासह अर्ज करण्यासाठी 8 ते 31 डिसेंबर असा कालावधी आहे. तर विलंब शुल्कासह 1 ते 15 जानेवारी अशी मुदत आहे.
हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केले.