एम. डी. पाखरे
आळंदी -टाळ-मृदंगाचा गजर, अखंड मंत्रोच्चारात गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने श्री संत ज्ञानेश्वर अर्थात माऊलींच्या संजीवन समाधी अर्थात कार्तिक सोहळ्याला अत्यंत मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. 8) सुरुवात झाली.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आणि नियमानुसार माऊलींचा समाधी सोहळा पार पडत आहे. आळंदीत संचारबंदी लागू आहे.
मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्तात मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी नऊच्या सुमारास माऊलींच्या समाधी मंदिरापुढील महाद्वार चौकात गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाच्या मुख्य कार्यक्रमास भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली.
मंदिराच्या स्वयंसेवकांनी पायरी स्वच्छ केली तसेच महाद्वारात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री गुरु हैबतबाबा यांच्या आकर्षक फुलांनी सजवलेल्या प्रतिमा लक्ष वेधून घेत होते. पायरी पूजेसाठी दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तराचे शिंपण आणि सोबत माऊलींचे पुजारी विधिवत मंत्रोच्चार सुरू झाला. साथीला मर्यादीत वारकऱ्यांचा माऊली… माऊली…नामाचा अखंड हरिनामाचा जयघोष सुरू होता.
गुरू हैबतबाबांच्या पायरीचे विधिवत पूजन पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार, राजाभाऊ पवार आणि सह कुटुंब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधिवत पूजा झाल्यानंतर माऊलींची आरती आणि पसायदान म्हणण्यात आले. त्यानंतर नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. माऊली मंदिरातील गुरू हैबतबाबांच्या ओवरीत आरती करण्यात आली.
वेदमूर्ती श्रीनिवास कुलकर्णी, अमोल गांधी यांनी पौराहित्य केले. यावेळी प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त ऍड. विकास ढगे, योगेश देसाई, आळंदी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, रामभाऊ चोपदार, राजाभाऊ चोपदार, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, दिनेश कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, योगेश आरु, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, डी. डी. भोसले, अजित वडगावकर, माऊली दिघे, भीमराव घुंडरे, माऊली गुळंजकर उपस्थित होते.
हैबतबाबांच्या वतीने विश्वस्त मंडळ आणि माऊलींच्या मानकऱ्यांना नारळप्रसाद देण्यात आला. सायंकाळी 6.30 ते 8.30 हभप योगिराज ठाकूर आणि सायंकाळी 9 ते 11 बाबासाहेब आजरेकर यांची किर्तन सेवा वीणा मंडपात पार पडली. तर हैबतबाबा पायरी पुढे रात्री 10 ते पहाटे 4 पर्यंत हभप वासकर महाराज, हभप मारुती महाराज कराडकर आणि हभप हैबतबाबा आरफाळकर यांच्या वतीने जागर करण्यात आला.