शिरूर -शिरूर भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक आणि शिपायाने जमीन मोजणी करून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मगितल्याचा प्रकार समोर आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
रवींद्र नारायण शेळके (वय 29) व दीपक शिवराम ताजणे (वय 40) अशी अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावे आहेत. रवींद्र हे शिरूर येथील उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालय भूकरमापक म्हणून नोकरीस आहेत. तर दीपक हा शिपाई आहे.
यातील तक्रारदार यांनी जमीनमोजणीसाठी भूमीअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. तसेच, आवश्यक ती शासकीय फी देखील भरलेली होती. पण त्यानंतरही लोकसेवक रवींद्र यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार अर्ज केला होता. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, पालीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, पोलीस हवालदार किरण चिमटे, नागेश देशमुख, नितीन कारले, पांडुरंग माळी यांनी शिरूर भुमीअभिलेख कार्यालय येथे येऊन ही कारवाई केली आहे.