कॅनबेरा – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा पल्ला पार केला. ही कामगिरी करताना त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले.
सचिनने 309 एकदिवसीय सामन्यांतून हा टप्पा गाठला होता. कोहलीने 251 वा सामना खेळताना ही कामगिरी केली. बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात कोहलीला हा टप्पा गाठण्यासाठी 23 धावांची आवश्यकता होती. या सामन्यात कोहलीने 63 धावांची खेळी करताना सर्वात कमी सामन्यांत 12 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम नोंदवला.
याच मालिकेत कोहलीने सचिनच्या आणखी एका कामगिरीला मागे टाकताना कमीत कमी सामने खेळताना 22 हजार आंतरराष्ट्रीय धावा देखील आपल्या नावावर जमा केल्या. यजमान ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय सामन्यांत सलग दोन पराभवांमुळे मालिका भारतीय संघाला जरी गमवावी लागली असली तरीही कर्णधार विराट कोहलीच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षा कमी डाव खेळताना कोहलीने 22 हजार आंतरराष्ट्रीय धावा आपल्या नावावर जमा करण्याचा विक्रम साकार केला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाला मालिकाही गमवावी लागली आहे. मात्र, कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आपले नाव सामील केले आहे. कोहलीने 462 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. सचिनने 493 डाव खेळताना हा पल्ला गाठला होता.
जडेजा कपिलच्या पंक्तीत
याच सामन्यात रवींद्र जडेजाने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत वादळी अर्धशतकी खेळी केली. या कामगिरीच्या जोरावर त्याने माजी कर्णधार कपिल देव यांच्या कामगिरीची बरोबरी केली. या सामन्यात जडेजाने 50 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 66 धावांची खेळी केली. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सर्वाधीक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कपिल देव पहिल्या
स्थानावर आहेत.