‘न’ तोडलेल्या नियमांचा पुणेकरांना नाहक त्रास

वाहन नंबरचा घोळ : भंग एकाकडून, मेसेज भलत्यालाच

  • वाहतूक पोलिसांच्या कारभाराला वाहनचालक वैतागले

हर्षद कटारिया

पुणे/बिबवेवाडी  – वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांच्या वाहनांचा नंबर सिग्नलवरील कॅमेरांद्वारे टिपला जातो. संबंधित वाहनचालकाच्या मोबाइल नंबरवर ऑनलाइन दंड पाठवला जातो. पण, हे प्रमाण वाढले असून कॅमेरांतून नंबरप्लेटचा स्पष्ट फोटो न आल्यामुळे भलत्याच मोबाइलधारकांना दंडाची रक्कम पाठवली जात आहे. त्यामुळे पुण्यातील वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत.

 

ऑनलाइन आलेल्या दंडाची रक्कम रद्द करण्यासाठी काय करावे, याबाबत वाहनचालक संभ्रमात आहेत. नाहक त्रास होत असल्याने अनेक वाहन मालक वैतागले आहेत. वाहतूक विभागाच्या माहितीनुसार कॅमेरांद्वारे सर्वाधिक दंड हेल्मेट नसणे आणि झेब्रा क्रॉसिंग ओलांडणे यासाठी झालेले आहेत. लेन कटिंग, फॅन्सी नंबरप्लेट, नो एंट्रीतून अथवा ट्रिपल सीट वाहन चालवणे, वेग मर्यादा ओलांडणे, सीट बेल्ट न लावणे. असे नियम तोडणाऱ्यांना हा दंड पाठवला जातो.

 

 

अनेक वाहनांच्या नंबर प्लेट जुन्या झालेल्या आहेत. अशावेळी त्यांचे नंबर व्यवस्थित दिसत नाहीत. अनेक वाहनांच्या नंबर सिरीज चुकीच्या दिसत असल्याने तशाच समांतर नंबर असलेल्या वाहन चालकाला दंडाची पावती मेसेजद्वारे पाठवली जाते. अनेकजण मेसेज दुर्लक्षितच करतात, त्यांना दंड भविष्यात भरावाच लागतो.

 

 

याबाबत एका वाहन मालकाने सांगितले, “माझ्या चारचाकीच्या नंबरमध्ये शेवटच्या आकड्यात नजर चुकीने दुसऱ्या गाडीचा नंबर पाहून हाय-वेला वाहन वेग मर्यादा तोडण्याचा दंड मला पाठवण्यात आला. त्या दिवशी मी गाडी वापरलीच नसल्यामुळे मला संशय आल्याने फोटो पाहिल्यावर सदर बाब समोर आली. आता तक्रार कुठे करावी? यासाठी वाहतूक पोलीस कार्यालयात चौकशी करणार आहे. त्या कामात माझा विनाकारण वेळ जाणार आहे. दंडाच्या रक्कमेचे चुकीचे मेसेज येऊन नाहक त्रास होत आहेत.’

 

 

माझे चारचाकी वाहन आहे. त्याच नंबरची सिरीज असलेल्या दुसरी दुचाकी असलेला चालक वारंवार नियम तोडतो. त्याच्या दंडाच्या रकमेचा मला वारंवार मेसेज येतो. त्याचा नाहक त्रास मला होतो. पुणे वाहतूक पोलिसांना मेल करून सर्व माहिती पाठवून पाठपुरावा करण्याचा त्रासदेखील मलाच सहन करावा लागत आहे. ज्या दुचाकी चालकांच्या नंबर प्लेटमधील अस्पष्ट दिसत असलेल्या अक्षरांमुळे माझा वेळ पाठपुरावा करण्यात जातो. अशा प्रकारांबाबत ठोस उपाय करणे गरजेचे आहे. प्रामाणिकपणे नियम पाळणाऱ्यांना वाहन चालकांना हा होणारा त्रास बंद करण्यासाठी काही उपाययोजना गरजेच्या आहेत.

– महेंद्र सुराणा, व्यावसायिक

काही वाहन चालकांना इतर वाहनांच्या नियम तोडल्याचा चुकून दंडाच्या पावत्या मिळतात. अशी संख्या फारच कमी आहे. दुचाकी असताना त्याच नंबरच्या चारचाकी गाडीने नियम तोडल्याच्या दंडाची पावती आल्याच्या काही घटना आहेत. ज्या वाहन चालकांना चुकीच्या दंडाच्या पावत्या येतात, त्यांनी पुराव्यासह अर्ज करून किंवा पुणे वाहतूक पोलीस कार्यालयात मेल करून माहिती दिल्यास, त्याची शहानिशा करून योग्य कार्यवाही केली जाते.

– राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.