बंगळुरू – बेहिशेबी मालमत्ता जमवल्या प्रकरणात चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेल्या तमिळनाडूतील राजकीय नेत्या व्ही. के. शशिकला यांनी आपली कारागृहातून लवकर सुटका करावी, अशी मागणी करणारा अर्ज कारागृह अधिक्षकांकडे केला आहे.
चार वर्षांच्या शिक्षेपैकी 43 महिन्यांचा कारावास त्यांनी भोगला आहे. नियोजित शिक्षा कालावधीनुसार त्या 27 जानेवारी 2021 ला कारागृहातून बाहेर येतील पण त्याच्या आधी आपल्याला सोडण्यात यावे, अशी विनंती त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
कारागृह नियमांनुसार चांगल्या वर्तणुकीच्या आधारे दर महिन्याला तीन दिवस शिक्षेतून सुट मिळू शकते त्या आधारे आपल्याला त्या तरतुदींचा लाभ देऊन आपली लवकर सुटका करावी, अशी त्यांची मागणी आहे.वरील तरतुदींनुसार त्यांना 135 दिवसांची सूट मिळू शकते. त्यांना कारावासाच्या शिक्षेसह दहा कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. तो दंडही त्यांनी भरला आहे.
शशिकला आणि त्यांच्या दोन अन्य नातेवाईकांनाही अशीच शिक्षा झाली आहे. या प्रकरणात जयललितांनाही कारावासाची शिक्षा झाली आहे. तथापि त्यांचे सन 2016 मध्येच निधन झाले आहे. 1997 आणि 2014 या साली शशिकला यांनी याच प्रकरणात 35 दिवस कारागृहात घालवले होते. ते दिवसही मोजले जावेत अशी त्यांची मागणी आहे.