दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीचे अध्यक्षपद मिळणे हा माझा बहुमान आहे. या सन्मानासाठी मी आयसीसीतील माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आभारी आहे. क्रिकेटचा विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करू. मला आशा आहे की सर्व उमेदवार मिळून महामारीपासून लढणाऱ्या क्रिकेटला पुढे घेऊन जातील. संघटनेचे सर्व 104 सदस्य मिळून क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करू, असे नवनिर्वाचित अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी (खउउ) न्यूझीलंडच्या ग्रेग बार्कले यांची निवड झाली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. त्यांनी इमरान ख्वाजा यांचा 11-5 असा पराभव करत सहा मतांनी निवडणूक जिंकली. वर्ष 2012 पासून ग्रेग बार्कले न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. तसेच वर्ष 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या आयोजन समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे.
इमरान ख्वाजा जुलै 2020 पासून आयसीसीच्या हंगामी अध्यक्षपदी होते. आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं. याआधी 2015 पासून 2020 पर्यंत भारताचे शशांक मनोहर आयसीसीचे अध्यक्ष होते.
बार्कले यांनी आयसीसीच्या संकेतस्थळाला एक मुलाखत दिली आहे. गेल्या वर्षी महिला आणि पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये केवढी सुरस होती, हे सर्व जगाने पाहिले असून, आयसीसी
दर्जेदार आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धा संयोजनाद्वारे आपले वेगळे अस्तित्व राखून आहे, याकडे लक्ष वेधून बार्कले म्हणाले की, प्रिमियर लीगसारख्या कितीही स्पर्धा आयोजित केल्या गेल्या तरी, अतिक्रिकेट होता कामा नये; तसेच खेळाडू हे पैसे कमावण्याचे यंत्र (कंपन्यांसाठी) बनता कामा नये, याकडेही लक्ष देणे गरजेचे बनले आहे, असे ते म्हणाले.
देशासाठी खेळण्याला खेळाडूंनी जास्त महत्त्व देणे गरजेचे असून क्लब क्रिकेट त्यामानाने कमी खेळले पाहिजे, अशी बार्कले यांची भूमिका आहे. न्यूझीलंडमधील क्रिकेट हे परिपक्व क्रिकेट असून कोणाही प्रतिस्पर्ध्याला त्यांच्या देशात हरवू शकेल, अशी क्षमता या संघाने कायमच बाळगली असून, आजवर अनेकदा ते राष्ट्रीय संघाने सिद्धही केले आहे, असेही बार्कले म्हणाले.
नो बिग-3 – बार्कले
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांना क्रिकेटविश्वात “बिग-3′ म्हणून ओळखले जात असले, तरी माझ्या कारकिर्दीत अन्य कोणत्याही सदस्य देशावर अन्याय होणार नाही. सध्या कसोटी आणि मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणाऱ्या (50 आणि 20 षटके) देशांच्या संख्येत नव्याने भर घालायची असून अधिकाधिक देशांमध्ये क्रिकेट लोकप्रिय कसा होईल, यासाठी आपण प्रयत्नशील असू, असे बार्कले म्हणाले.