पुणे – दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्यास सराईत गुन्हेगारास दत्तवाडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्या विरुध्द भारतीय हत्यार कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला. बापु उर्फ परशुराम अरुण जानराव(41, रा.अप्पर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दत्तवाडी पोलिसांच्या तपास पथकातील पोलिस हवालदार कुंदन शिंदे व पोलिस अंमलदार विष्णु सुतार यांना खबर मिळाली होती की, एक व्यक्ती नवरत्न हॉटेलच्या गल्लीत पिस्तूल घेऊन कोणाची तरी वाट बघत आहे. त्यानूसार तपास पथकाचे प्रभारी स्वनिल लोहार आणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने यांना माहिती देण्यात आली.
त्यांच्या आदेशाने एक पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल आणी खिशात दोन काडतूसे सापडली. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने पिस्तूल वारजे माळवाडी येथे मोकामधुन सुटलेल्या सख्ख्या मेव्हण्याकडून घेतल्याचे सांगितले.
बापु जानकर याच्यावर सहकारनगर व बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचे तीन तसेच तोडफोड, जाळपोळ आणी दारुविक्री असे एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापुर्वी मोका अंतर्गतही कारवाई झाली आहे. त्याने दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल जवळ बाळगल्याचे सांगितले.
ही कारवाई पोलिस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त पोमाजी राठोड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने, पोलिस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, पोलिस हवालदार कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, अंमलदार महेश गाढवे, अमित सुर्वे, विष्णू सुतार, अक्षयकु वाबळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, नवनाथ भोसले, सागर सुतकर , शरद राऊत यांच्या पथकाने केली. याप्रकरणाचा तपास पोलिस हवालदार सुधीर घोटकुले करत आहेत.