राजगुरूनगर- चास कमान धरणावर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पर्यटक सर्रास नियमांचे उल्लंघन करून थेट धरणाच्या भिंतीवर थेट दुचाकी, चारचाकी लावून हौसे, नवसे, गवसे पर्यटनाच्या नावाखाली धुडगूस घालत आहेत. तर थेट पाण्यात उतरून जीव धोक्यात घालून “सेल्फी’ काढत आहेत. दरम्यान, धरणावर प्रेमी युगलांच्या वाढत्या संख्येमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
करोनामुळे अनेक महिने बंद असलेले पर्यटन गेल्या महिन्यांत सुरू करण्यात आले. त्यामुळे यंदा पावसाळी सहलीला मुकलेले पर्यटक दिवाळी सुट्टीचा आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी चास कमान परिसरात गर्दी करीत आहेत. चास कमान धरण परिसरातील डोगंररांगातून पसरलेली घनदाट हिरवाई, अथांग पसरलेला जलाशय आणि थंड हवेमुळे अनेक परिवार एक दिवसीय पर्यटन सहल करीत आहेत.
मात्र, यावेळी त्यांच्याकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. धरणाच्या भिंतीवरून पर्यटक बिनधास्त पाण्यात उतरुन स्वतःचा जीव धोक्यात घालत आहे. सेल्फी आणि फोटोच्या नादात धरणाच्या जलसाठ्यात पडण्याचा धोका वाढला आहे. कोणत्याही धरणांच्या भिंतीवर फिरण्यास आणि पाण्यात उतरण्यास नियमाने बंदी असताना ती धुडकावत आणि येथे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांचे न ऐकत त्यांना दमदाटी करीत अनेकजण चक्क धरणाच्या भिंतीवर दुचाकी आणि चारचाकी वाहने लाऊन धुडगूस घालत असल्याने धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे.
पर्यटकांना आवरणे कठीण
धरण स्थळावर कर्मचारी असूनही मोठ्या संख्येत पर्यटक येत असल्याने त्यांना ते आवर घालू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागते. पाटबंधारे विभागाकडे मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग उपलब्ध असताना येथे काही ठरविक कर्मचारी असल्याने सुट्टीमध्ये पर्यटकांना आवर घालणे जिकिरीचे होत आहे. त्यातच त्यांना ड्रेसकोड नसल्याने आलेल्या पर्यटकांकडून रोषाला सामोरे जावे लागत आहे.
जागोजागी रंगताहेत मद्याच्या पार्ट्या
पर्यटनाच्या नावाखाली येणारे मद्यपी पर्यटक जागोजागी बसवून पार्ट्या करून दारूच्या काचेच्या आणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्या जागेवर सोडून जातात. त्यातच मद्यपी काचेच्या बाटल्या बसलेल्या ठिकाणी फोडत असल्याने नव्याने जाणाऱ्या पर्यटकाना त्याचा मोठा धोका पोहोचत आहे. चपला बूट कापून अनेकांचे पाय चिरल्याच्या घटना घडत आहेत. तसेच बरोबर आणलेले साहित्य याच परिसरात आणि पाण्यात थेट फेकून देत असल्याने या परिसरात प्लॅस्टिकच्या वस्तूंचा खच पडला आहे. यामुळे निसर्गाची हानी होत आहे.
======================================