डिप्लोमा विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी प्रवेशाकडे लक्ष

थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया अद्याप जाहीर नाही

पुणे – दहावीनंतर तीन वर्षे अभियांत्रिकी डिप्लोमा शिक्षण घेतल्यानंतर पदवीसाठी थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया अद्याप जाहीर झालेली नाही. अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्षाची अध्यापनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, अजूनही प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप अनिश्‍चितता आहे. त्यामुळे डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी प्रवेशाकडे लक्ष लागले आहे.

डिप्लोमानंतर अभियांत्रिकी पदवीच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश दिला जातो. यासाठी दहा टक्‍के जागा राखीव असतात. यात डिप्लोमानंतर अभियांत्रिकी पदवी घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. मात्र, यंदा या प्रवेशाबाबत कोणतीही सूचना जाहीर झालेली नाही. याउलट दुसरीकडे अभियांत्रिकीचे द्वितीय वर्षाचे वर्गही सुरू झाले आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

अकरावी, बारावी विज्ञान शिक्षण घेण्याऐवजी तंत्रशिक्षणातील पदविका घेऊन अभियांत्रिकीची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. ही पदविका मिळाल्यानंतर हे विद्यार्थी पदवीसाठी थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेऊ शकतात. यासाठी एकूण जागांच्या 20 टक्‍के जागा राखीव असतात. मात्र, मागील शैक्षणिक वर्षापासून जास्तीत जास्त 10 टक्‍के जागाच राखीव ठेवण्याचा नियम केला आहे. यामुळे मागील वर्षीपासून या प्रवेशातही चुरस निर्माण झाली आहे.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी चुरस, त्यात अद्याप प्रवेश प्रक्रिया जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांवर ताण येत आहे. यातच द्वितीय वर्ष पदवी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्गही सुरू झाले आहेत. यामुळे ही प्रवेश प्रक्रिया कधी होईल याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. सरकारने तातडीने द्वितीय वर्ष अभियांत्रिकीचे प्रवेश प्रक्रिया जाहीर करावी आणि या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालकांतून होत आहे.

आरक्षणावरून सर्वच प्रवेश प्रक्रियेला स्थगिती
डिप्लोमाच्या अंतिम वर्षाचे निकाल नुकतेच जाहीर झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीच्या थेट द्वितीय वर्षातील प्रवेशाची प्रक्रिया सुरू करणे शक्‍य आहे. मात्र, सध्या आरक्षणावरून सर्वच प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया जाहीर झालेली नाही, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.