वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांनी “जुग जुग जिओ’चे शुटिंग सुरू केले आहे. या दोघांचा या सिनेमातील फर्स्ट लुक इन्स्टाग्रामवर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये हे दोघे पती-पत्नीच्या रोलमध्ये दिसणार आहेत. आधुनिक वेशभुषेमध्ये वरुण आणि कियारा एकमेकांना बिलगलेले या फोटोमध्ये दिसत आहेत. “जुग जुग जिओ, हॅपी हस्बंड’ असे कियाराने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. तर वरुणने “जुग जुग जिओ हॅपी वाईफ’ अशी प्रतिक्रियाही दिली आहे. या सिनेमामध्ये या दोघांशिवाय अनिल कपूर आणि नीतू कपूरदेखील असणार आहेत.
7 वर्षांनी नीतू कपूर पडद्यावर पुनरागमन करत आहे. यापूर्वी 2013 मध्ये पती ऋषी कपूरबरोबर “बेशर्म’मध्ये नीतू यांनी काम केले होते. त्यानंतर पुन्हा सिनेमाच्या सेटवर येण्याचा अनुभव खूपच रोमांचकारी असल्याचे नीतू यांनी म्हटले आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या “जुग जुग जिओ’चे डायरेक्शन राज मेहता करणार आहे. फुल्ल कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा असे “जुग जुग जिओ’चे स्वरुप असणार आहे.