वरुण धवन मागील काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट जुगजुग जियोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वीच वरुण धवन व या चित्रपटातील त्याची को-स्टार कियारा आडवाणी हे दोघे एका इव्हेंटसाठी गेले असता वरुणने तिला उचलून घेतलं होत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. वरुण धवनचे फॅन्स त्याच्या याच मस्तीखोर स्वभावावर फिदा आहेत. जुगजुग जियोच्या प्रमोशनचे काम उरकून सध्या वरुण धवन पॅरिसला रवाना झाला असून तेथे तो जान्हवी कपूरसोबत ‘बवाल’ करतोय.
बवाल हे वरुण व जान्हवी यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दोघेही पॅरिसला पोहचले आहेत. वरून धवनने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली असून यामध्ये वरुण व जान्हवी पॅरिस एअरपोर्टवर फोटोसाठी पोज देताना दिसतायेत. या फोटोमधे वरुण विमानतळावरील डिव्हायडरवर टायटॅनिक पोजमध्ये उभा आहे तर जान्हवी हाताची घडी घालून उभी आहे.
जान्हवी नुकतीच सुट्ट्यांसाठी फ्रांसला गेली होती. सुट्ट्यांमध्ये तिने येथील अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या असून त्याचे फोटो आपल्या फॅन्ससोबत शेअर केले आहेत. सुट्टी संपताच जान्हवी आता पॅरिसमध्ये दाखल झाली आहे. वरुण व जान्हवी येथे बवाल या त्यांच्या आगामी चित्रपटासाठी शूटिंग करणार आहेत. आगामी वर्षात एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या बवालमधून ही जोडी प्रथमच एकत्र पाहायला भेटणार आहे.
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, वरुण धवनकडे 24 जून रोजी रिलीज होणारा जुगजुग जियो आणि अमर कौशिकचा कॉमेडी-हॉरर भेडिया हे चित्रपट आहेत. दुसरीकडे जान्हवी कपूरकडे राजकुमार रावसोबत मिस्टर आणि मिसेस माही, दोस्ताना 2, मिली ऍण्ड गुड लक जेरी हे चित्रपट आहेत. पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘बवाल’ चित्रपटात या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांसाठी बवाल ठरणार का हे पाहावे लागणार आहे.