न्यूयॉर्क – कोविड-19च्या प्रतिबंधासाठी फायझर अणि बायोएनटेक या जागतिक पातळीवरील औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी विकसित केलेल्या लसीची परिणामकारकता 95 टक्के असल्याचा दावा या कंपन्यांनी केला आहे. मॉडर्ना कंपनीने केलेल्या लसीची परिणामकारकता 94.5 टक्के असल्याचा दावा दोनच दिवसंपूर्वी करण्यात आला होता.
त्या पार्श्वभुमीवर फायझर आणि बायोएनटेकच्या एमआरएनए आधारित “बीएनटी162बी2′ या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवालही प्रसिद्ध करण्यात आला आहे. या चाचणीमध्ये प्राथमिक अपेक्षित परिणाम साध्य होत असल्याचा निष्कर्श काढण्यात आला आहे. या दोन्ही कंपन्यांनी या वर्षभरात जगभरासाठी लसीचे 5 कोटी डोसचे तर 2021 च्या अखेरीपर्यंत 1.3 अब्ज डोसचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मॉडर्ना या आणखी एका औषध कंपनीनेही विकसित केलेली करोना विरोधी लस 94.5 टक्के परिणामकारक असल्याचा दावा केला आहे.
त्यापूर्वी फायझर आणि बायोएनटेक कंपन्यांनीही कोविड-19 चा संसर्ग टाळण्यासाठी लसीची परिणामकारकता 90 टक्क्यांपेक्षा अधिक आढळत असल्याचे म्हटले होते. लसीची कार्यक्षमता वय, लिंग, वंश आणि वांशिक लोकसंख्याशास्त्रात सुसंगत होती.