पुणे – पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ गाइड (मार्गदर्शक) उपलब्ध होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी असणाऱ्या; तसेच दहा वर्षे औद्योगिक क्षेत्रासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञाला “ऍडजंक्ट प्रोफेसर’ आणि “गाइड’चा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात पीएचडीसाठी तज्ज्ञ गाइड, गाइड होण्यासाठीचा कालावधी कमी करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान असणारे मार्गदर्शक उपलब्ध व्हावेत, यासाठी उद्योग जगतासारख्या विविध सेवा क्षेत्रांतील संबंधित तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक असते.
त्यासाठी या क्षेत्रात पीएचडीचे शिक्षण घेऊन, किमान दहा वर्षे कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी गाइड म्हणून नेमण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. या गाइड विद्यापीठाकडून ऍडजंक्ट प्रोफेसरचा दर्जा देण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणातील सूचनांप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला.
त्याचप्रमाणे पीएचडीचा अभ्यास पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना आणखी पाच वर्षे गाइडशिप मिळवण्यासाठी वाट पाहावी लागते. अशावेळी त्याचे शोधनिबंध चार उत्तम नियतकालिकांमध्ये प्रकाशित असल्यास त्याला गाइडशिप मिळण्यासाठी सूट देण्यात येईल.