- अन्य दिवशी सुट्टी नाही : घेता येणार सणाचा आनंद
पिंपरी – यंदा शनिवारी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आल्याने अनेकांचा हिरमोड झाला असला तरी आयटीयन्स मात्र सुखावले आहेत. आयटीयन्सला शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्याने त्यांना दिवाळी साजरी करता येणार आहे. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात एक लाखाहून अधिक आयटीयन्स वास्तव्यास आहेत. हे आयटीयन्स भारतात जरी काम करत असले तरी त्यांना भारतीय सणांना सुट्ट्या मिळत नाहीत. परंतु त्यांना शनिवार आणि रविवार सुट्टी मिळत असल्याने या दोन दिवसांमध्ये कोणताही सण आला तर त्यांना तो आनंदाने साजरा करता येतो.
आयटीयन्सचे बहुतेक काम हे परदेशातील कंपन्यांसोबत सुरु असते. भारतीय सण-उत्सवांना सार्वजनिक सुट्टी असली तरी परदेशी कंपन्यांमध्ये त्या सुट्ट्या नसतात. पर्यायाने येथे बसून आयटीयन्सला भारतीय सणांच्या दिवशी काम करावे लागते. आयटीयन्स ज्या देशातील प्रोजेक्टवर काम करत असतात, त्या देशातील उत्सव आणि सणांना येथील आयटीयन्सना सुट्ट्या मिळतात. परंतु भारतीय सणांसाठी त्यांना रजा घ्यावी लागते. संपूर्ण स्टाफला रजा देणे शक्य नसल्याने सणांच्या दिवशी रजा घेण्यासाठी आयटीयन्समध्ये प्रतिस्पर्धा पहावयास मिळते.
करोनामुळे मिळाली संधी
यावर्षी करोनामुळे अजूनही बहुतेक आयटी कंपन्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु असल्याने त्यांना यंदा घरुनच काम करत करत दिवाळीचा आनंद घेता येणार आहे. परंतु कामातून त्यांची सुटका नाही. त्यात मुख्य दोन सण शनिवारी आल्याने मात्र ते सुखावले आहेत. दरवर्षी आयटीयन्स भारतीय सण आपल्या कार्यालयातच साजरे करतात. घरापेक्षा जास्त आपला डेस्क सजवितात. कार्यालयातच मिठाई आणतात आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करतात.
यंदा मात्र करोनाने त्यांना आपल्या कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करण्याची संधी दिली आहे. दरवर्षी दिवाळी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येते. नाताळापूर्वी परदेशी कंपन्यांमध्ये मोठा वर्कलोड असतो. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात भारतातील आयटीयन्सला कामाचा ताण अधिक असतो.
आयटीयन्सच्या सुट्ट्या
आयटीयन्सच्या सुट्ट्या या ते कोणत्या देशातील प्रोजेक्टवर काम करत आहेत. यावर अवलंबून असतात. परंतु प्रामुख्याने अमेरिकेत साजऱ्या होणाऱ्या उत्सवाला भारतातील आयटीयन्सला सुट्ट्या घ्याव्या लागतात. त्यात प्रामुख्याने जानेवारीत नवीन वर्ष, किंग मार्टिन लूथर जयंती, फेब्रुवारीमध्ये प्रेसिडेंट डे, एप्रिलमध्ये गुड फ्रायडे, मे मध्ये मेमोरियल डे, जुलैमध्ये अमेरिकन स्वातंत्र्य दिन, सप्टेंबरमध्ये लेबर डे, नोव्हेंबरमध्ये थॅक्स गिव्हिंग डे आणि डिसेंबरमध्ये नाताळची सुट्टी असते. नाताळ आणि थॅंक्स गिव्हिंग डे सोडल्यास इतर कोणतीही सुट्टी शनिवारी किंवा रविवार आल्यास तेथील कर्मचाऱ्यांना त्याच्या एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारी सुट्टी दिली जाते. पर्यायाने भारतातील आयटीयन्सला देखील अशाच सुट्ट्या मिळतात.