- अतिरिक्त आराेग्य वैद्यकीय अधिकार्यांना अधिकार पुन्हा बहाल; 15 दिवसांत निर्णय फिरविला
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या जात असलेल्या बेकायदेशीर पदोन्नत्या, चुकीचे पदभार, महासभेला अंधारात ठेवून घेतले जाणारे निर्णय आणि अवघ्या काही दिवसांतच आयुक्तांकडून फिरविले जात असलेले निर्णय यामुळे आयुक्तांच्या हेतूविषयी संशय निर्माण झाल्याचे चित्र महापालिका वर्तुळात पहावयास मिळत आहे. त्यातच अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे यांचे काढून घेतलेले अधिकार अवघ्या पंधरा दिवसांत पुन्हा त्यांना बहाल केल्यामुळे आयुक्तांच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय निर्णयांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मनमानी सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सहशहर अभियंता प्रविण तुपे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्ताचा अतिरिक्त पदभार दिल्यापासून अशा चुकीच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केवळ राजकीय दबावातून एखाद्या अधिकाऱ्याचे नियमावलीला कशा पद्धतीने फाटा देऊन लाड पुरविले जातात त्याचे तुपे यांच्याकडील पदभार हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.
गेल्या सहा महिन्यांमध्ये अशाच पद्धतीने आयुक्तांनी घेतलेले अनेक निर्णय संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 27 आक्टोबर रोजी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे यांच्याकडील बहुतांश पदभार काढून सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना देण्यात आले होते. वायसीएम वगळता महापालिकेच्या सर्व रुग्णालयांसह वैद्यकीय विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बदल्या, वैद्यकीय मुख्य कार्यालय, मध्यवर्ती औषध भांडारासह अनेक विभागांची जबाबदारी गोफणे यांना देण्यात आली होती. तर साळवे यांच्याकडे कमी महत्त्वाचे व शासकीय जबाबदारीसह जन्म-मृत्यू नोंदीसारखे विषय सोपविण्यात आले होते.
कामकाजाचे वाटप होऊन पंधरा दिवसांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा जबाबदारीचे वाटप करत गोफणे यांच्याकडे दिलेले अनेक विभाग पुन्हा साळवे यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडील कोविडचे काम काढून घेत साळवे यांना देण्यात आले आहे. वारंवार आयुक्त बेजबादारीने घेत असलेल्या आणि पुन्हा निर्णय फिरवित असल्याने या विषयाची चांगलीच चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. चुकीच्या पद्धतीने घेतले जाणारे निर्णय हे राजकीय दबावातून घेतले जातात की अज्ञानातून अथवा चुकीच्या अधिकाऱ्यांच्या आग्रहावरून हा खरा संशोधनाचा विषय आहे. वारंवार होत असलेल्या या प्रकारामुळे आयुक्तांच्या हेतूविषयीच शंका निर्माण झाली आहे.
डॉ. गोफणेंची नियुक्तीच चुकीच्या आधारावर
महापालिकेच्या नव्या आकृतीबंधानुसार सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी हे पद मंजूर झाले आहे. या पदावर ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याची सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती करण्याची अट आहे. मात्र डॉ. गोफणे हे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदावर नियमित होण्यापूर्वी सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी करण्यात आले. 27 आक्टोबर रोजी गोफणे यांना सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदाचे कामकाज सोपविण्यात आले तर 3 नोव्हेंबर रोजी गोफणे यांची ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा नियमित करण्यात आली. बेकायदेशीर आणि बेजबाबदारीने केलेल्या या कामकाज वाटपाचीही चांगलीच चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती.
सातत्याने होणारे बदल राजकीय दबावातून?
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले श्रावण हर्डीकर हे राजकीय दबावातून निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आयएएस अधिकारी म्हणून असलेली त्यांची पकड निसटल्याने तसेच यापूर्वी काही उलट-सुलट निर्णय घेतले असल्याने त्या बाबी समोर येऊ नये नव्यानेही चुकीची कामे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांमध्ये बोलले जात आहे. आपण घेत असलेल्या चुकीच्या निर्णयामुळे व्यक्तीगत सेवेवर आणि भविष्यातील पदोन्नतीवरही त्याचे परिणाम होण्याच्या भीतीतूनच असे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.
उपायुक्तपदाबाबत घेतलेला निर्णय येणार अंगाशी?
महापालिकेच्या चार सहायक आयुक्तांना उपायुक्त करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 14 आक्टोबर रोजी घेतला आहे. उपायुक्त पदासाठी आरक्षण न ठेवणे, महासभेचा हक्कभंग करणे, वेतश्रेणी बदलत असताना स्थायी समितीची मान्यता न घेणे, पदोन्नती समिती नियुक्त न करणे, शासनाची दिशाभूल करणे असे अनेक प्रकार सहायक आयुक्तांची उपायुक्तीपदी नियुक्त करताना घडले आहेत. माजी उपमहापौर तुषार हिंगे हे या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया उभी करण्याची शक्यता असल्याने आयुक्तांना हा निर्णय चांगलाच भोवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.