पुणे – “कन्टेन्ट एक्स्प्रेस डिलिव्हरी’ ही ऑनलाइन शिक्षण प्रणाली ई-कन्टेन्ट विकसित करण्यासाठीचे उत्तम व्यासपीठ आहे. भविष्यात ही प्रणाली शिक्षण क्षेत्रात नक्कीच क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ई-कन्टेन्ट डेव्हलपमेंट अँड लर्निंग इनोव्हेशन सेंटरतर्फे तयार केलेल्या “कन्टेन्ट एक्स्प्रेस डिलिव्हरी’ या ऑनलाइन शिक्षण प्रणालीचे उद्घाटन पटवर्धन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. पटवर्धन म्हणाले, करोनामुळे एक खूप चांगली गोष्ट घडली आहे, ती म्हणजे समस्यांचे निदान आपण आपल्या देशातच शोधायला लागलो आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तयार केलेली ऑनलाइन शिक्षण प्रणाली हे याचे उत्तम उदाहरण आहे.
पाश्चिमात्य देशांकडून जे काही येईल ते चांगलेच असेल, असा यापूर्वी आपल्या सर्वांचा समज होता. आता आपण वैज्ञानिक आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोनातून शिक्षण कसे घेता येईल याचा जास्त विचार करत आहोत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी हा शिक्षणाच्या केंद्रस्थानी असणार आहे.