कराड – करोना महामारीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी येथील मंडई परिसरात अनेक ठिकाणी भाजी व अन्य विक्रेत्यामुळे होणारी नाहक गर्दी, अस्त व्यस्त विक्रेत्यांमुळे अपूरा पडणारा रस्ता व वाहतुकीची होणारी कोंडी, रस्त्यावर केलेली अतिक्रमणे यामुळे नगरपालिकेने मंगळवारी शहरातील मंडई परिसरात अतिक्रमण मोहिम राबवली. अनेक हातगाडे, खोकी व अन्य साहित्य यावेळी पालिकेने ताब्यात घेतले. आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह स्वतः मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
दरम्यान, अनेक व्यापारी व विक्रेत्यांनी यावेळी पालिका मुख्याधिकारी व कमचाऱ्यांशी वादावादी करण्याचा प्रयत्न केला. नगरपालिकेने प्रभात टॉकीज, महात्मा फूले पूतळ्यापासून जनता व्यासपीठापर्यंत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहिम राबवली. यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजुला वहातुकीला अडथळा ठरणारी खोकी, हातगाडे व अन्य साहित्य हाटवली. तर जनता व्यासपीठासमोर पार्क केलेली अनेक वाहनेही हटवण्यात आली.
मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मुख्याधिकारी रमाकांत डाके व आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्तात महात्मा फूले पूतळ्यापासून अतिक्रमण मोहिम सुरू केली.पुतळ्यापासून मंडईकडे जाणाऱ्या रोडवरील अडथळा ठरणारी अनेक अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. तर या परिसरात रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना बसण्यास मनाई करण्यात आली. पालिकेच्या भिंतीसमोरील भाजी विक्रेत्यांना हटवण्यात आले आहे.
जनता व्यासपीठासमोरील मैदानात अनेक दिवसांपासून पार्क केलेली वाहने, मैदानात असणारी खोकी, चायनीजचे गाडे काढण्यात आले असून इतरत्र बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा मोकळी करुन देण्यात आली आहे. यावेळी पालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या बरोबर विक्रेत्यांनी बराच वेळ वाद घातल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.