पुणे – पुणे शहरात शाळा व महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. यापाठोपाठ आता पुण्याची ओळख ऑटोमोबाइल आणि आयटी हब अशी होऊ लागली आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यातील सिटी कॉर्पोरेशन लि. आणि मेथीबाई देवराज गुंदेचा फाउंडेशन यांच्या वतीने ऍमनोरा टाऊनशिपमध्ये उभारण्यात येणाऱ्या छत्रभूज नरसी या आयबी व केंब्रिज पॅटर्न असलेल्या शाळेच्या भूमिपूजनाप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऍमनोरा सिटी कॉर्पोरेशन लि.चे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, नरसी मोनजी शिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त जयराज ठक्कर, आमदार चेतन तुपे आदी उपस्थित होते.
“कोविड 19 नंतर आता नजीकच्या भविष्यात शाळांमध्ये असणाऱ्या सोयी सुविधांमध्ये काही प्रमाणात बदल होणार आहेत, हे गृहीत धरून आपण सर्वांनीच तयार रहायला हवे. यासाठी केंद्र व राज्य सरकार यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे देखील गरजेचे आहे. छत्रभूज नरसी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या शाळेची उभारणी होत असताना त्यांचे स्मरण करायला हवे. व्यवसायात आलेल्या यशाचा उपयोग स्वत:साठी न करता त्यांनी आपल्या संपत्ती समाजासाठी शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी वापरली ही मोठी बाब आहे,’ असेही पवार यांनी सांगितले.
“प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा अधिकार आहे, मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार असावा या संकल्पनेवर काम करणे महत्त्वाचे आहे. नव्या महाराष्ट्राचे स्वप्न पाहत असताना केवळ रट्टा मारत पूर्ण केलेले शिक्षण नव्हे तर मुलांमधील उत्सुकतेला योग्य मार्ग उपलब्ध करून देत त्यांच्या नवसंकल्पनांना व्यासपीठ देणे गरजेचे आहे. भविष्यात अशीच शिक्षण व्यवस्था उभारण्यावर आमचा भर असणार आहे,’ असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यातील सिटी कॉर्पोरेशन लि. आणि मेथीबाई देवराज गुंदेचा फाउंडेशन यांच्या वतीने नर्सरी ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी छत्रभूज नरसी शाळा सुरू करण्यात येत आहे. ऍमनोरा टाऊनशीपमध्ये तब्बल 3 लाख स्केअर फूट इतक्या जागेत बांधण्यात येत असलेल्या या शाळेतील एकूण 4.1 एकर क्षेत्र हे शाळेसाठी तर 2.33 एकर क्षेत्र हे केवळ खेळाच्या मैदानासाठी उपलब्ध असणार आहे. शाळेतील अभ्यासक्रम हा आयबी व केंब्रिज पॅटर्ननुसार असणार आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे वर्ग, प्रयोगशाळा, खेळाची व्यवस्था, डे केअर सेंटर, संगीत व नृत्य स्टुडिओ हे शाळेचे वैशिष्ट्य असेल. सप्टेंबर 2021 पासून प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार आहे. जून 2022 मध्ये शाळा कार्यरत होणार आहे.