पुणे – शहरात एकूण चाचण्यांच्या तुलनेत नव्याने करोना बाधित होणाऱ्यांचा टक्का मागील पाच आठवड्यांत 50 टक्के घटला होता. मात्र, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा टक्का पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनी वेळीच खबरदारी न घेतल्यास दिवाळीनंतर करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची भीती आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.
करोना बाधितांच्या संख्येने शहरात सप्टेंबरअखेरीस उच्चांक गाठला होता. त्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही साथ शहरात ओसरण्यास सुरूवात झाली. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, दि. 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत सुमारे 37,665 चाचण्या करण्यात आल्या. त्यात, सुमारे 8 हजार 997 बाधित सापडले होते. त्यानंतर पुढील प्रत्येक आठवड्यात हा बाधितांचा टक्का कमी झाला. तर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात (दि. 23 ते 29) हा टक्का 10.8 पर्यंतखाली आला होता.
या आठवड्यात 17 हजार 853 चाचण्या करण्यात आल्या त्यात, सुमारे 1 हजार 927 बाधित आढळून आले होते. त्यानंतर, मात्र, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा शहरातील करोनाबाधितांचा टक्केवारी वाढण्यास सुरुवात झाली आहे. दि.30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत शहरात सुमारे 17,011 चाचण्या करण्यात आल्या असून, त्यात 1970 (11.6 टक्के) नवीन बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी किंचित वाढली असली, तरी ही बाब पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याच्या दिशेने सुरू आहे.
169 नवे बाधित; 392 करोनामुक्त
करोनाबाधितांची संख्या शनिवारी 169 नोंदवण्यात आली; तर 392 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात 12 बाधितांचा मृत्यु झाला. यातील दोन रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या 399 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील 259 रुग्ण व्हेन्टिलेटरवर आहेत. शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 63 हजार 57 आहे तर डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 53 हजार 531 आहे. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 5,195 आहे. दिवसभरात 2469 स्वॅबटेस्ट करण्यात आल्या.