मान्सूनचा यंदा सुखद सांगावा : शेतकऱ्यांना मोठा दिलासा

पुणे – भारतीय शेतकऱ्यांसाठी वरदान असणारा मान्सून अर्थात मोसमी पाऊस यंदा सरासरीच्या 96 टक्के म्हणजे सर्वसाधारण बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी जाहीर केला आहे. हा पहिल्या टप्यातील अंदाज असून दुसऱ्या टप्प्यातील अंदाज जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे.

हवामान विभागाच्या वतीने मान्सूनचा अंदाज वर्तविताना 1951 ते 2000 सालापर्यंतच्या मान्सूनच्या सरासरी आकडेवारीचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर हिंदी महासागरातील तापमानाचा सुद्धा अभ्यास केला जातो. हवामान विभागाने यंदा डायनेमिकल ग्लोबल क्‍लाईमेट फोरकास्टिंग यंत्रणा कार्यान्वित केली असून त्याद्वारे प्रशांत महासागरावरुन वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग आणि त्यातील आर्द्रता याची माहिती घेण्यात आली आहे. हा सगळा अभ्यास व आकडेवारी आणि निरीक्षणे एकत्रित करुन हा अंदाज तयार करण्यात आला आहे.

या अंदाजानूसार जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये देशात यंदा सरासरी 96 टक्के पाऊस पडणार आहे. या अंदाजात 5 टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. मान्सूनच्या चार महिन्यांच्या काळात देशात साधारणत: 887 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा देशाच्या विविध भागांत समान पाऊस पडणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. यंदाचा मान्सून सर्वसाधारण स्वरूपाचा राहण्याच्या पूर्वानुमानामुळे दिलासादायक चित्र यंदा पाहण्यास मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

असा आहे अंदाज
सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस हा सर्वसाधारण गटात गणला जातो. तर, यंदाच्या मान्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्‍यता सर्वाधिक ( 39 टक्के), तर दुष्काळाची शक्‍यता कमी (17 टक्के) असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात 97 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात सरासरीच्या 91 टक्के ( उणे 7 टक्के) पाऊस पडला होता.

एल-निनो कमकवूत राहणार
मान्सूनवर परिणाम करणारा एल-निनो यंदा फारसा प्रभावशाली ठरणार नाही. मान्सूनच्या चारही महिन्यांत तो सक्रिय होईल, अशी कुठलीही शक्‍यता नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. प्रशांत महासागरावरील तापमानावरुन एल-निनोची स्थितीचा अभ्यास केला जातो पण यंदा मात्र तापमान सामान्य असल्यामुळे एल-निनो प्रभावशाली ठरणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.