… तर विधानसभेला मतदानावर बहिष्कार टाकू

रेवलकरवाडी ग्रामस्थांचा इशारा : गावात कायमस्वरूपी एसटी सेवा देण्याची मागणी

पुसेगाव – अरुंद रस्त्याच्या कारणावरून रेवलकरवाडी (ता. खटाव) येथे एसटी सेवा अनेक वर्षे बंद होती. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी लोकसभेच्या निवडणुक मतदानावर बहिष्काराचा सर्वपक्षीय घेतला होता. तथापि, प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार व रस्त्याची समस्या दूर करुन एसटी सुविधा पुरवण्याचे आश्‍वासन प्रशासनाच्यावतीने देण्यात आले. त्यामुळे बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेत आहोत पण कायमचा तोडगा निघाला नाही तर विधानसभा निवडणुकीत पुन्हा बहिष्कार टाकण्याचा इशारा सरपंच संगीता कदम यांनी गावकऱ्यांच्यावतीने दिला आहे.

गेली अनेक वर्षे अरुंद रस्त्याच्या कारणावरून रेवलकरवाडी गावात एसटी सेवा बंद असल्याने ग्रामस्थांची व शालेय विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. यासंबधी ग्रामपंचायतीद्वारे वेळोवेळी संबधित अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या निर्दशनास ही समस्या आणून यावर ठोस उपाययोजना झाली नाही. परिणामी ग्रामस्थांनी मतदान बहिष्काराचे अस्त्र उगारले. यासंबधीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन संबंधित प्रशासकीय विभाग खडबडून जागे झाले. नायब तहसीलदार मदने, वाहतूक नियंत्रक राऊत, जिल्हा परिषद बांधकाम अभियंता शिर्के, निवडणूक शाखा कोरेगावचे खाडे व मंडल अधिकारी तोडरमल यांनी (ता. 8) रोजी ग्रामस्थांशी संवाद साधून समस्येवर मार्ग काढण्याची ग्वाही दिली.

याशिवाय कोरेगाव उपविभागीय अधिकारी कीर्ती नलवडे यांनी ग्रामस्थांच्या बरोबर बैठक घेऊन ग्रामस्थांची समस्या माहीत करून घेतली. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर रस्ता व एसटी सेवेचा प्रश्‍न लगेच मार्गी लावण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. तसेच शालेय मुलांची होणारी गैरसोय दूर व्हावी, म्हणून एसटी सेवा सुरू होत नाही, तोपर्यंत शालेय मुलामुलींकरिता मिनीबसची सोय त्वरित करण्याचे आश्‍वासन दिले व ग्रामस्थांना मतदानाचे महत्त्व नलवडे यांनी पटवून दिले. ज्यानंतर ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला. सातारा बांधकाम विभागाचे सानप, तालुका कृषीअधिकारी सुनील साळुंखे, विसापूरचे माजी सरपंच सागर साळुंखे, तलाठी मोहिते, ग्रामसेविका सारिका घाडगे, सरपंच संगीता कदम, उपसरपंच आनंदराव बिटले, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.