6 महिन्याच्या बाळासह 3 लहान मुलांचा अंत
नवी दिल्ली : दिल्लीतील किरारी भागातील तीन मजली इमारतीला लागलेल्या आगीमध्ये किमान 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 महिन्याच्या बाळासह 3 लहान मुलांचाही समावेश आहे, असे दिल्ली फायर सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या इमारतीच्या तळमजल्यावर कपड्यांचे गोदाम आहे.
तर उर्वरित तिन्ही मजले रहिवासी आहेत. रहिवासी आणि व्यवसायिक दुकाने असलेल्या या इमारतीतील एका घराला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशामक दलाचे 8 बंब घटनास्थळी रवाना झाले. पहाटे 3.30 च्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात यश आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
किरारी भागातील या इमारतीतून तिघाजणांना सुखरूप सोडवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. आगीपासून वाचण्यासाठी 24 वर्षीय पूजा या महिलेने 10 आणि 3 वर्षांच्या आपल्या मुलींसह शेजारच्या इमारतीवर उडी मारली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इमारतीच्या मालकासह एकूण 9 जणांचा या आगीमध्ये मृत्यू झाला. यामध्ये एका दाम्पत्यासह त्यांच्या तीन लहान मुलांचाही समावेश आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घरातल्या गॅस सिलेंडरचा आगीमुळे स्फोट झाला. या स्फोटामुळे इमारतीचा काही भाग कोसळला.
इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणा अस्तित्वात असल्याचे आढळले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही आग लागण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. त्याचा शोध सुरू आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी आणि त्या आगीमुळे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज आहे.
इमारतीचे मालक रामचंद्र झा यांनी तळमजला कपड्यांच्या गोदामासाठी विजय सिंह कटारा यांना भाड्याने दिला होता. या आगीमध्ये 20 लाख रुपयांचे कपडे जळून खाक झाल्याचा दावा कटारा यांनी केला आहे. मरण पावलेल्यांमध्ये रामचंद्र झा स्वतः आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचा समावेश आहे.
या आगीबाबतचा अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
याच महिन्याच्या सुरुवातीला उत्तर दिल्लीतील अत्यंत गजबजलेल्या अनाज बाजार परिसरातील चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये 43 जणांचा मृत्यू झाला होता.